नितीन गडकरींचे पृथ्वीराज चव्हाण यांनी मानले आभार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड-उंब्रज सिंगल पिलर उड्डाणपुलासाठी निधी मंजूर; NH-48 वरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत; अपघातांची शक्यता घटणार

कराड/प्रतिनिधी : –

कराड शहरासह उंब्रज परिसरातील वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील कराड व उंब्रज येथे सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच अपघात व संभाव्य जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

काम दोन वर्षांपूर्वी सुरू : कराड व उंब्रज ही दोन्ही ठिकाणे कराड तालुक्यातील महत्त्वाची व्यापारी केंद्रे असून, राष्ट्रीय महामार्ग (NH-48) या दोन्ही शहरांमधून जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी, तसेच अपघातांचे प्रमाण वाढत होते. कराड शहरात विद्यमान भरीव उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

पाहणी व नागरिकांशी संवाद : याच धर्तीवर उंब्रज येथेही सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानंतर चव्हाण यांनी उंब्रज येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधत ही मागणी रास्त असल्याचे स्पष्ट केले.

पत्रव्यवहार, पाठपुरावा व निर्देश : यानंतर २४ ऑगस्ट २०२३ पासून त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार, तसेच दूरध्वनीद्वारे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या ठिकाणी उड्डाणपूल उभारणीच्या व्यावहारिकतेचा अभ्यास करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) दिले.

अहवालानंतर पृथ्वीराज चव्हाणांशी बैठक : त्याअनुषंगाने NHAI च्या अधिकाऱ्यांनी उंब्रज येथे प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला. यानंतर अधिकाऱ्यांसमवेत पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक होऊन पुलाच्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

निर्णयाची माहिती पत्राद्वारे कळविली : या सर्व प्रक्रियेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासकामांना प्राधान्य देत कराड व उंब्रज येथे सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील निर्णयाची माहिती त्यांनी पत्राद्वारे पृथ्वीराज चव्हाण यांना कळविली आहे.

सकारात्मक निर्णय : याबाबत प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कराड व उंब्रज येथे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार उड्डाणपूल उभारणी अत्यावश्यक होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक निर्णय घेत निधी मंजूर केल्यामुळे कराड तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार असून, भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल.

आभार मानले : कराड व उंब्रज येथील सिंगल पिलर उड्डाणपुलासाठी निधी मंजूर केल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्यातील जनतेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!