वडगाव हवेली केंद्रशाळेत मातृपूजनाने महिला दिन साजरा
कराड/प्रतिनिधी : –
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत मातृत्वाचा गौरव आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा भावनिक महिला सन्मान व मातृपूजन सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आईच्या चरणी वंदन करत कृतज्ञता व्यक्त केल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक रंग चढला.
उत्सवी वातावरण : कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील ग्रामपंचायत महिला सदस्या, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्या, अंगणवाडी सेविका-मदतनीस, शिक्षिका तसेच माता-पालक यांचे फेटे बांधून व पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले. स्त्रीशक्तीचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यामुळे शाळा परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
...अन् डोळ्यांत तरळले आनंदाश्रू : सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेले मातृपूजन विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरले. विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे पाय धुऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली, आरती ओवाळून पेढा भरवला आणि त्यांच्या चरणी मस्तक टेकवून आशीर्वाद घेतले. या भावनिक क्षणांनी उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि मातृत्वाचा सन्मान करणारा वातावरणात अनोखा भावस्पर्श निर्माण झाला.
स्त्रीशक्तीच्या कार्याचा गौरव : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. विद्याताई जगदीश जगताप होत्या. त्यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत स्त्रीशक्तीच्या कार्याचा गौरव केला.
संस्कारमय संदेश : प्रमुख मार्गदर्शिका माजी पंचायत समिती सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ. रुपालीताई यादव यांनी महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित करत ‘प्रत्येक आईमध्ये शिक्षक आणि प्रत्येक शिक्षकामध्ये आई असावी,’ असा संस्कारमय संदेश दिला. त्यांनी पालकांनी मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवण्याचे महत्त्वही स्पष्ट केले.
यशवंतांचे विशेष अभिनंदन : यावेळी इस्रोसाठी निवड झालेल्या भक्ती उत्तम चव्हाण, तसेच सैनिक स्कूलसाठी निवड झालेल्या असद आरिफ मुजावर, राजवर्धन दिगंबर जगताप व जुनेद अय्याज शिकलगार या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
उपस्थिती : कार्यक्रमास केंद्रप्रमुख राजेंद्र कुंभार यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन पदमा कुंभार यांनी केले. अघाव सरांनी शाळेची यशोगाथा मांडली, तर सपाटे मॅडम आणि हवालदार मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. पवार सरांनी आभार मानले.
मार्गदर्शन व सहकार्य : वरिष्ठ मुख्याध्यापक यशवंत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपाटे मॅडम, पवार सर, अघाव सर, ठोंबरे सर, जाधव मॅडम, हवालदार मॅडम, कुंभार मॅडम, हसबे मॅडम, लोखंडे सर, शेडगे सर, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दौलतराव जगताप, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.