बेलवडे जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बालचमूंच्या नृत्याविष्कारातून सामाजिक-सांस्कृतिक संदेश; स्वागत कमान, सीसीटीव्ही व संगणक संचांची भेट

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचा संदेश : बालचमूंनी सादर केलेल्या नृत्याविष्कारातून सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचा प्रभावी संदेश देत उपस्थितांची मने जिंकली.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास केंद्रप्रमुख प्रवीण कारंडे यांच्यासह गावचे सरपंच डॉ. सुशांत मोहिते, ब्रह्मदास पतसंस्थेचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य मारुती मोहिते, जयवंतराव मोहिते, रुपेश मोहिते, शिवाजीराव मोहिते, माणिकराव मोहिते, इंजि. भगवान मोहिते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश खंडेराव मोहिते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वागत कमान : यावेळी शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनीही उदारहस्ते सहकार्य केले. ‘शाळेसाठी करिता दान, भविष्य आपलेच होईल महान’ या विचाराला अनुसरून उदयसिंह धोंडीराम मोहिते यांनी शाळेच्या स्वागत कमान बांधकामासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा निधी धनादेशाद्वारे सुपूर्द केला.

सीसीटीव्ही कॅमेरे : आनंदराव उद्धव रेपाळ (सर) यांनी शाळेसाठी सहा सीसीटीव्ही कॅमेरे देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला हातभार लावला.

संगणक संच : स्टॅम्प वेंडर सचिन रामचंद्र मोहिते आणि ब्रह्मदास पतसंस्था बेलवडे बुद्रुकचे संस्थापक वसंतराव राजाराम मोहिते (सर) यांनी प्रत्येकी दोन संगणक संच भेट देत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाला विशेष रंगत : कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक गीतांवर आकर्षक नृत्य सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली. देशभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि संस्कारमूल्ये या विषयांवरील सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

प्रास्ताविक व सहकार्य : कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला वसंतराव मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन श्री. बोंगाळे सर आणि सौ. राजमाने मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. बोंगाळे मॅडम, सौ. पाटील मॅडम, तसेच सर्व शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

शेतकरी मुलांच्या विवाहाचा प्रश्न नाटिकेतून अधोरेखित

ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या वाढत्या समस्येवर विद्यार्थ्यांनी “नवरी मिळेना शेतकऱ्याला” या नाटिकेतून प्रभावी प्रकाश टाकला. शिक्षिका सौ. राजमाने मॅडम लिखित या नाटिकेचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व पालकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. केंद्रप्रमुख प्रवीण कारंडे यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे व विषय निवडीचे विशेष कौतुक केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!