आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माजी विद्यार्थिनींचा गौरव
कराड/प्रतिनिधी : –
सौ. वेणूताई चव्हाण महाविद्यालय, कराड येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘आम्ही वेणूताईंच्या लेकी’ या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समाजाच्या परिवर्तन प्रक्रियेत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, महिलांनी शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. अरुणा चव्हाण यांनी केले.
माजी विद्यार्थिनी सन्मान सोहळा : येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार समिती आणि गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘आम्ही वेणूताईंच्या लेकी’ या माजी विद्यार्थिनी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
समाज परिवर्तनात निर्णायक भूमिका : या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ. चव्हाण म्हणाल्या, भारतीय स्त्रियांनी आज शिक्षण, संशोधन, उद्योग, सामाजिक कार्य आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधत समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. कौटुंबिक आणि सामाजिक विकासामध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, समाजाच्या परिवर्तन प्रक्रियेत त्यांची भूमिका निर्णायक ठरत आहे.












