????श्रीशिवछत्रपतींची प्रेरणा व वासोटा भ्रमंतीची दिव्यानुभूती????

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भाग सातवा : 

वासोट्याचा अगदी माथ्यावर पोहोचलो आहोत याची खात्री समोर दिसणाऱ्या प्रवेशद्वाराच्या ढासळलेल्या खुणा स्पष्टपणे दर्शवत होत्या. त्या ठिकाणी नतमस्तक होत आम्ही आतील बाजूस पाऊल टाकले. समोरच एक भग्नावस्थेतील वास्तू मशालीच्या उजेडात आपल्या अखेरच्या घटकांची जाणिव करून देत होती. काही वेळ आम्ही तिथेच थांबलो. सगळी रात्र आज इथेच काढावी लागणार होती. परंतु थांबण्यासाठी एखादा निवारा असेल तर बरे, असे आमच्यात बोलणे सुरू होते.

पुन्हा एकदा तोच दिव्यानुभव….. आमचे बोलणे संपते न संपते तोच अगदी क्षणार्धात तो *श्वान* पुढे सरसावला आणि आम्ही उभे होतो तिथूनच दक्षिण दिशेला वळून चालू लागला. आता पर्यंतच्या स्वानुभवातून तो श्वान आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाणार याची खात्री पटली होती.

*एक वेळ माणस आपल्या मार्गात दिशाभूल करतील, फसवतील पण हा श्वान निश्चितच तसे करणार नव्हता.* त्यामुळेच तर आमचा स्वतःवरचा आत्मविश्वास ठासळला होता तरी त्या श्वानावर मात्र पूर्ण विश्वास निर्माण झाला होता.

आता पुन्हा एकदा तो श्वान पुढे व आम्ही त्याच्या मागून चालू लागलो. अगदी थोड्याच अंतरावर आम्हाला एक मंदिर दिसून आले. हे मंदिर मात्र काही प्रमाणात का होईना सुव्यवस्थित होते. आम्ही आत डोकावून पाहिले. आतील बाजूस मुख्य गाभारा होता आणि पुढील बाजूला थोडी मोकळी जागा होती. अर्थात त्या मोकळ्या जागेच्या दोन्ही बाजू उघड्याच होत्या. पण आता आम्हाला आडोसा तरी मिळाला होता. ती जागा इतकी अपुरी होती की पाय पसरून झोपता येणार नव्हते. पण पाय पोटाशी दुमडले तर किमान विश्रांती घेता येणार होती.

आम्ही हातातील साहित्य खाली ठेवले. भुकेची जाणीव जणू मृत झाली होती पण घशाला कोरड पडली होती. आमच्या जवळ पिण्यासाठी पाणी देखील शिल्लक नव्हते. पुन्हा एकदा या नव्या समस्येने आम्हाला घेरले होते. आम्ही बसलो होतो तिथेच तो श्वानही आमच्या अगदी पायाशी विसावला होता. पण “पाणी कुठे मिळणार” हे शब्द उच्चारले मात्र आणि त्याच क्षणी तो श्वान उठून मंदिराच्या बाहेर पडला.
कशाचाही विचार न करता आणि क्षणाचाही विलंब न करता आम्ही सुद्धा त्याचे अनुसरण केले. बाहेर पडून तो श्वान ज्या दिशेने आम्ही आलो त्या दिशेने जाऊ लागला. त्याची पाठ आता तरी सोडायची नव्हतीच! दक्षिण दिशा पकडून तो पुढे जात राहिला. बरेच अंतर गेल्यावर तो थांबला. आम्ही त्याच्या जवळ जाऊन मशालीच्या उजेडात समोर पाहिले तर तिथे दोन पाण्याचे प्रशस्त तलाव होते. ते दिसत तर होते पण…..आमच्या मागे लागलेली प्रश्नावली संपेनाच! यातील नेमके पिण्यायोग्य पाणी कुठले? बहुतेक आमच्या मनाचा उडालेला गोंधळ त्याने तत्क्षणी ओळखला आणि जे पाणी पिण्यायोग्य होते तिथे जाऊन तो उभा राहिला.

आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि कोरड पडलेल्या घशाला ओलावा दिला. त्यानंतर मग तो श्वान पुढे झाला आणि त्याने त्याची तहान भागवली. आता आम्ही पुन्हा माघारी वळलो आणि त्या मंदिरात दाखल झालो. जमेल तसे जमिनीवर पसरलो. त्या अपुऱ्या जागेत थोडीशी मोकळी जागा पाहून तो श्वानही विसावला. तसेही मध्यरात्र उलटून गेली होती.
पण किमान उजेडेपर्यंत आम्हाला तिथेच रेंगाळत राहणे अपरिहार्य होते.

क्रमशः 
समीर श्री. आराणके ( ज्येष्ठ पत्रकार, कराड) 
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८ 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!