भर पावसात ‘ड्युटी फर्स्ट’!

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

जय गोसावी यांची कर्तव्यदक्षता कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर व्हायरल, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव 

कराड/प्रतिनिधी : – 

आज शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे कराड व मलकापूर शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसामुळे काही काळासाठी वाहतूक व्यवस्था कोलमडली. अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्यावर असलेले कराड वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी जय गोसावी यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा मात्र सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

कर्तव्यदक्षता : सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने अवघ्या १५ ते २० मिनिटांतच शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले. कृष्णा कॅनॉल परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुसळधार पाऊस, विजांचा गडगडाट आणि वेगवान वाऱ्याचा सामना करत गोसावी यांनी भर पावसात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी धडपड सुरू ठेवली. पूर्णपणे भिजत असतानाही त्यांनी वाहने योग्य दिशेने वळवून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला.

कॅमेऱ्यात कैद : त्यांची ही धावपळ व धडपड आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा पाहून अनेक नागरिक भारावून गेले. काहींनी हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच गोसावी यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होऊ लागले आहे. प्रवासी, नागरिक, तसेच सहकारी पोलीस कर्मचारी यांनीही त्यांच्या सेवाभावाला सलाम केला.

दिलासा : दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र अचानक कोसळलेल्या सरींमुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आणि वाहतुकीचा वेग मंदावला. भाजी मंडई परिसरातही विक्रेते आणि शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. पावसापासून माल वाचवण्यासाठी व्यापाऱ्यांना कसरत करावी लागली.

आणखी पावसाची शक्यता : अचानक आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला, तरी शहरातील दैनंदिन जीवन काही काळासाठी विस्कळीत झाले. हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही अशाच स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!