उंडाळे विभागातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी; डॉ. सुरेश भोसले यांचा पुढाकार
कराड/प्रतिनिधी : –
उंडाळे विभागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या वाकुर्डे योजनेला थकीत वीजबिलामुळे वारंवार अडथळे येत होते. परिणामी, अनेक गावांतील शेतकऱ्यांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या गंभीर परिस्थितीत कृष्णा कारखान्याने पुढाकार घेत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
सामाजिक बांधिलकीची जाणीव : कारखान्याचे चेअरमनडॉ. सुरेश भोसले यांनी ही मदत देत सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा अधोरेखित केली. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.
धनादेश सुपूर्द : पेठ नाका (ता. वाळवा) येथील वाकुर्डे योजनेच्या अधिकाऱ्यांकडे थकीत वीजबिलापोटी तीन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
योजनेवर अवलंबून गावे : कराड तालुक्यातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे आदी गावांतील नागरिक या योजनेवर अवलंबून आहेत.
मदतीची मागणी : वीजबिल थकबाकीमुळे या योजनेचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने शेतकऱ्यांनी कारखान्याकडे मदतीची मागणी केली होती.
समाधान : या मागणीची तातडीने दखल घेत कारखान्याने पुढाकार घेतला आणि वारणा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार व सहाय्यक अभियंता विजय आंबोळे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले.
मान्यवरांची उपस्थिती : या प्रसंगी कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, नांदगावचे सरपंच हंबीरराव पाटील, माजी सरपंच संजय शेवाळे, तसेच विविध गावांतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रश्न सुटण्याची अपेक्षा : वाकुर्डे योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न निकाली निघाल्याने उंडाळे विभागातील शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळाला असून, आगामी हंगामात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.