????श्रीशिवछत्रपतींची प्रेरणा व व्याघ्र गडाची दिव्यानुभूती!

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

गडद अंधारातून गडाची ती चढण सर करताना आमची त्रेधा उडाली होती. अशा परिस्थितीत कुणी कुणाला सावरायचे? मधूनच मशालीवरील गुंडाळलेले वस्त्र जळून खाक व्हायचे. ते अगदी धगधगून विझत आले की आम्ही दुसऱ्या फांदीवर टॉवेल गुंडाळून त्याची मशाल करण्याची पूर्वतयारी करून ठेवत होतो. आता पर्यंत एक बनियन व एक टॉवेलने आगीच्या भक्ष्यस्थानी आपले बलिदान दिले होते. त्यावेळी बनियन व टॉवेल यांची मानवी जीवनातील खरी किंमत आम्हाला कळली होती.

त्या मशालीच्या उजेडात फक्त हाताच्या अंतरावर असलेले दृश्य नजरेस पडत होते. रातकिड्यांचा किर्र…..किर्र असा कानाला बोचणारा व टोचणारा आवाज….अजस्त्र वृक्ष, त्यांच्या त्या अक्राळ विक्राळ फांद्या….एकीकडे भय तर दुसरीकडे गडावर पोहचण्याची धडपड अधीकच तीव्र करत होती. त्या धडपडीत मधूनच एखाद्याची घसरगुंडी उडत होती. पण त्यातूनही धीर धरत आम्ही एक एक पाऊल पुढे सरकत होतो. पण आता मात्र एक विलक्षण गोष्ट घडली…..

आनंदने (आंद्या) अचानक मध्येच बसकण मारली. या चढणीने त्याचा पुरता ‘धूर’ काढला होता. बास….बास….आता मी पुढे चालू शकत नाही….त्याचे हे शब्द ऐकले मात्र आणि आमच्या अंगात इतका वेळ संचारलेले सगळे अवताण गळून पडले. त्याची एकूणच झालेली अवस्था पाहून रडावे की हसावे तेच समजेना. अर्थात आमचीही तिच अवस्था होती पण सांगणार कुणाला आणि ऐकणार तरी कोण? समदुःखी म्हणजे काय ते त्या क्षणी आम्ही अनुभवत होतो.

पुढचा काही वेळ आंदयाची समजून काढण्यात गेला. पण तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी माझे साहित्य तुम्ही घ्याल तर मी येतो असे त्याने सांगितले. ते ऐकून इथेच “कपाळ मोक्ष” करून घ्यावा, असे वाटत होते. कारण साहित्य म्हणजे हातातील पिशवी आणि त्यातील अंगवस्त्रे इतकेच! पण आम्हालाही होकार देण्याखेरीज पर्याय होताच कुठे? त्याचे ते वजनदार साहित्य आम्ही हातात घेतले आणि आंदयाने आपली बसकण उचलली.
खरं म्हणजे माझी अवस्था तर त्याच्या पेक्षा जास्त बिकट होती.

कारण मी तर चक्क ब्रिफकेस (एकच हँडल असलेली सुटकेस) घेतली होती. ब्रिफकेस घेऊन पदभ्रमण करण्यासाठी निघालेला हा मनुष्य दुर्मिळच म्हणायचा! एकीकडे ती ब्रिफकेस व दुसरीकडे स्वतःचा तोल सांभाळताना झालेली कसरत अद्यापही ताजीतवानी आहे. मध्येच कुठे तरी झाडाच्या फांदीला ती ब्रिफकेस अडकवून खांद्यावर घ्यायची….परत काही अंतरावर पुन्हा हातात …..एक ना दोन तऱ्हा! इथे एक बाब अधोरेखित करून पुन्हा पूर्व पदावर येऊया.

ज्यांना स्वतःवर केलेला विनोद किंवा उपहास सहन होत नाही त्यांनी इतरांच्या भावनांची कदर करण्यास शिकायला हवे. सध्या सोशल मीडियावर याचा अनुभव आपण दररोज घेतच आहोत. माणसं “स्वमतांधतेकडे” इतकी झुकली आहेत की जर आपल्या मताला थोडेही भिन्न मत कोणी व्यक्त केले तर माणसं हमरीतुमरीवर उतरत आहेत. त्यातून परस्परांविषयी निर्माण होणारा द्वेष संपूर्ण समाजहिताला बाधक ठरू लागला आहे.

असो! माझी जी अवस्था झाली होती ती वाचून तुमच्या मनात जो विचार या क्षणी येत आहे तोच त्यावेळी माझ्याही मनात उफाळला होता. फक्त त्या भावना इथे शब्दात वर्णन करून सांगता येणार नाहीत. (तेवढी सभ्यता अजूनही कायम आहे.) पण तुम्हाला त्या समजल्याच असतील!

त्या भावना मनातच दडवून ठेवत पुढील वाटचाल सुरू झाली आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने आंदयाने अगदी निर्धाराने बसकण की फतकल मारली. “नाही म्हणजे नाही……”नो मिन्स नो”…..त्याने घेतलेला, धारण केलेला दशावतार पाहून आमची पुरती…..होती. “रात्रभर इथेच बसून रहायचे” यावर जणू तो ठाम भूमिकेवर आला होता.

त्याची झालेली केविलवाणी अवस्था पाहून आम्ही देखील हतबल झालो होतो. नेमकी अशीच काहीशी अवस्था आम्ही ज्यावेळी विविध गडांची पदभ्रमंती केली त्यावेळी अनेकांची, अनेकदा झाली होती. पण आमच्यासाठी हा पहिल्याच पदभ्रमणात आलेला पहिलाच अनुभव होता. आता त्याची समजूत कशी काढावी ही विवंचना भेडसावत होती आणि आम्हाला उपाय सापडला होता. तो म्हणजे झाडाच्या दोन फांद्या घ्यायच्या आणि पुढे व मागे एक जण असे दोन्ही बाजूंनी त्या धरायच्या. आणि त्यांच्या अगदी मधोमध आंदयाने त्या फांद्या धरून पुढे सरकत रहायचे. एक जण सर्वात पुढे मशाल घेऊन मार्ग दाखवणार होता.

त्या परिस्थितीत सुचलेली ही उपाययोजना कामी आली. फक्त अधेमधे आम्ही आमच्या जागेची अदलाबदल करत होतो. आंदया एकमेव असा होता की ज्याने शेवटच्या क्षणापर्यंत आपली जागा टिकवून धरली होती. वेळ पुढे सरकत होती आणि आम्ही गडाच्या माथ्यावर कूच करत होतो. एका ठिकाणी पोहचल्यावर आजूबाजूला असणारी झाडी विरळ होत मागे पडली. आम्ही मोकळ्या जागेत व आकाशाच्या छायेत दाखल झालो होतो. इथूनच अगदी थोड्याच चढणीवर गडाचा माथा लागत होता. अजूनही तो श्वान आमच्या पुढे चालत होता. बहुधा रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते आणि आम्ही गडाच्या माथ्यावर पाऊल टाकले होते.

क्रमशः
समीर श्री. आराणके ( ज्येष्ठ पत्रकार, कराड) 
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!