भाग आठवा :
जून महिन्याचा पहिला दिवस उजाडला होता. नुकतेच पूर्वेकडे थोडे तांबडे फुटू लागले होते. आम्हालाही हळूहळू जाग येत होती. ” *सकाळी ११ पर्यंत परत इथेच या* ” हे त्या नावाड्याचे शब्द कानात गुंजन करू लागले. पण गडावर थोडे तरी फिरून त्याच्या इतिहासात बुजलेल्या पाऊल खुणा थोड्या तरी पहायला नकोत का? तशा जर त्या पहायच्या किंवा अवलोकन करून किमान नजरेखालून घालायच्याच नसतील तर गडावर जाण्यासाठी इतकी धडपड हवीच कशाला?
पण सध्या अशा विचाराने गडकिल्ल्यांची सफर करणारे अनेक महाभाग दिसून येतात. म्हणजे आपण गडकिल्ल्यांवर नेमके कशासाठी जात आहोत याचे भान हरवत चालले आहे. गडकिल्ले ही प्रेक्षणीय स्थळे किंवा पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. एकूणच शिवप्रेमी भक्तांना ही बदललेली मानसिकता निश्चित वेदनादायक ठरत आहे. म्हणूनच ” *इतिहासात डोकावत असताना वास्तवाचे भान राखत भविष्याचा वेधही घेता यायला हवा* “.
तेच वास्तवाचे भान राखत आम्ही रात्रीचा सगळा शिणवटा झटकून टाकला. सूर्योदय होणार अशी चिन्हे दिसू लागली आणि आम्ही गडाच्या कानाकोपऱ्या पर्यंत भ्रमंती आरंभिली. खरे तर तिथे पाहण्याजोगे काहीच शिल्लक राहिले नव्हते. अगदीच नाही म्हणता येणार नाही कारण गडाच्या अगदी एका कड्यावर दोन तोफा आपले अस्तित्व टिकवून होत्या. शिवाय दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, जिकडे नजर जाईल तिथे वृक्षांची दाटीवाटी, धडकी भरवणारी दरी, सह्याद्रीची अजस्त्र विस्तारलेली उंच-सखल शिखरे जणू इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत असेच अभिमानाने सांगत होती.
वासोटा किल्ल्याचा तो संपूर्ण परिसर आम्ही न्याहाळत होतो. ज्या काळात म्हणजे १९९१ सालात बहुतेकांना हा किल्ला अज्ञात तरी होता किंवा दुर्लक्षित होता असे म्हणणे अधिक योग्य होईल. असे म्हणण्याचा उलगडा पुढे गेल्यावर होईलच की! पण आता आम्हाला गडावरून पाय उतार होण्याची वेळ जवळ येत होती. सगळा गड फिरून आम्ही मंदिरात परतलो. ते शिवमंदिर होते. आत जाऊन (गाभाऱ्यात) आम्ही दर्शन घेतले आणि प्रत्येकाने स्वतःच्या साहित्याला हात घातला.
किमान गडावरून उतरताना प्रत्येकाने स्वतःचे ओझे स्वतः वाहायचे होते. अर्थात रात्री जो काही प्रसंग आला होता तो उतरताना तरी येणार नव्हता. कदाचित या मधल्या काळात तुम्हाला कुणाचा तरी विसर पडलेला दिसतो. हो इतका वेळ झाला तो श्वान कुठेच कसा दिसत नाही? की त्याचे काम पूर्ण करून तो कुठे तरी निघून गेला की अदृश्य झाला? नाही हो ! असे काहीच घडले नाही. तो आमच्या बरोबर सगळ्या गडावर फेरफटका मारायला सोबतच होता. अहो “तो” होता म्हणून आम्ही होतो”.
परतीची पायवाट सुरू झाली. सोबत पिण्यासाठी पाणी भरून घेतले आणि पायथ्याकडे उतरण्यास सुरुवात झाली. येताना वाटेत परत एकदा त्या मारुतीच्या चरणी नतमस्तक झालो. साधारण पावणे अकराच्या सुमारास जलाशयाच्या काठावर दाखल झालो. कालची ती लॉंच व तो नावाडी वेळे आधीच उपस्थित झाला होता. आम्ही लॉंचमध्ये चढलो आणि आमची नजर मागे वळली…..डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या…..निस्तब्ध….निःशब्द अवस्था…..तो श्वान मोठ्या अपेक्षेने आम्हाला न्याहाळत होता…..त्याची ती नजर आम्हाला अंतर्बाह्य हलवत होती….आमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्या जलाशयाला देखील लाजवत होते…..लॉंच सुरू झाली….पुढे निघाली….तो श्वान काठावरून धावत होता…..जो पर्यंत त्याच्या अंगात शक्ती होती तेवढी एकवटून तो धावत होता…..आमच्या अश्रूधार त्याला धावताना पाहून अधिकच वेगाने वाहत होत्या…..एका क्षणी तो धावायचा थांबला….लॉंच पुढे सरकत होती आणि तो आमच्या नजरेआड होत गेला……
म्हणूनच आमचे श्वानप्रेम बेगडी नसून स्वानुभवातून आलेले आहे!












