कराड दक्षिण ‘वीजबिल मुक्त’ करण्याचा संकल्प

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. अतुल भोसले; नांदगाव-विंग येथे भव्य प्रकल्पांचे उद्घाटन, दहा हजार घरांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणी

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला ‘वीजबिल मुक्त’ करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेत, पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारणीला वेग देण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील तब्बल दहा हजार घरांवर एक ते तीन किलोवॅट क्षमतेचे सोलार प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, घरगुती ग्राहकांना शून्य वीजबिलाचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

उद्घाटन : कराड तालुक्यातील नांदगाव व विंग येथे उभारण्यात आलेल्या सौर प्रकल्पांचे उद्घाटन आमदार भोसले यांच्या हस्ते पार पडले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपअभियंता स्वप्नील जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पंचायत समिती सदस्य गोविंद गावडे, मंडल अध्यक्ष सीमा साबणे, सरपंच हंबीरराव पाटील, योगेश पाटील, अवधूत इनामदार, हर्षवर्धन मोहिते, सागर पाटील, सर्जेराव थोरात, शंकरराव थोरात, सचिन पाटील, सुशांत मोहिते, अभिजीत कोठावळे, दीपक हजारे, दत्तात्रय माने, तानाजी चौरे, दत्तात्रय थोरात, मारुती मोहिते आदी उपस्थित होते.

वीजबिल पूर्णपणे शून्यावर : याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेत आमदार भोसले म्हणाले, एप्रिल अखेरपर्यंत सुमारे १,५०० घरांवर सौर उपकरणे बसवण्याचे नियोजन असून, यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर बसवलेल्या प्रकल्पांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सदरच्या घरांमध्ये पूर्वी १३०० ते २५०० रुपयांपर्यंत येणारे वीजबिल आता पूर्णपणे शून्यावर आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

जलद गतीने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर : केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघात कृष्णा सहकारी बँकेच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. ऊर्जा विभागाच्या सहकार्याने नागरिकांना कोणताही त्रास न होता जलद गतीने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघ रोल मॉडेल बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याने ते उल्लेखनीय व दर्जेदार आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे राबवल्याने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ राज्यात रोल मॉडेल बनवण्यात आम्ही यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वप्न लवकरच साकार : यामुळे निश्चितच लगतच्या मतदारसंघातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही योजना राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरात एक कोटी घरांवर पीएम सूर्यघर योजना कार्यान्वित करण्याचे स्वप्न लवकरच साकार करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही योजना यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!