कराड विभागातील २२ पोस्ट कार्यालयांतून सेवा; शाळा-ग्रामपंचायतींमध्येही होणार शिबिरे
कराड/प्रतिनिधी : –
सामान्य नागरिकांना आधारसारखी अत्यावश्यक सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय डाक विभागाने ‘आधार आपल्या दारी’ या उपक्रमाची प्रभावी सुरुवात केली आहे. नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये हा उपक्रम वर्षभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कराड विभागातील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्य उद्देश : कराड डाक विभागाच्या अधीक्षिका स्वाती दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे २०२६ पासून विभागातील २२ पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती सेवा नियमितपणे उपलब्ध होणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना शहरात जावे लागू नये, हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे.
सेवा : या उपक्रमांतर्गत मागणीनुसार गावोगावी विशेष आधार शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, शासकीय संस्था, सोसायट्या, मंडळे किंवा प्रतिष्ठान यांनी अशा शिबिरांची मागणी केल्यास संबंधित ठिकाणी सेवा पुरवली जाणार आहे.
संपर्क साधा : यासाठी नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी किंवा कराड येथील डाक अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुभारंभ : अभियानाचा शुभारंभ २ मे रोजी होणार असून, प्रारंभी कराड प्रधान डाकघर, सुपने, औंध व वडुज उपडाकघर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सेवा सुरू राहणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती : या प्रसंगी डाक अधिकारी गणेश पाटील, अमित देशमुख आणि सी. एम. नदाफ उपस्थित होते.
आवाहन : डाक विभागाने सर्व नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, विशेषतः आधार सेवा आवश्यक असलेल्या गरजू घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही अधोरेखित करण्यात आले आहे.