प्रा. वसंतराव हंकारे; पळून जाणे उपाय नाही, संवादच नात्यांचा श्वास
कराड/प्रतिनिधी : –
आईच्या प्रेमाला शब्द असतात, पण बापाच्या प्रेमाला कृतीचा आवाज असतो. मुलांच्या भविष्याकरिता स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवणारा बाप आयुष्यभर सावलीसारखा उभा असतो. त्याच्या मुक प्रेमाच्या जाणिवेने आयुष्य बदलते. मात्र, यशाच्या क्षणी आपणास त्याचा विसर पडतो आणि अपयशाच्या वेळी त्यालाच जबाबदार धरतो, हीच आजच्या समाजाची शोकांतिका असल्याचे परखड प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंतराव हंकारे यांनी केले.
वर्धापन दिन : येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे समता सामाजिक विकास संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘चला बाप समजून घेऊ’ या व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे होते. यावेळी कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, माजी नगरसेविका सावित्री मुटेकर, स्मिता हुलवान, वैद्यकीय अधीक्षक सुनीता लाळे, अर्जुन कोळी, संदीप पवार, संजय कांबळे, अनिल घराळ, नरेंद्र लिबे, अरुण जोगर, प्रा. डॉ. श्रीधरपंत सव्वाखंडे यांची प्रमुख उपस्थित होती.

संवाद कमी होत चाललाय : आजच्या तणावपूर्ण आणि तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीवर भाष्य करताना प्रा. हंकारे म्हणाले, मोबाईल, सोशल मीडिया आणि धावपळीच्या दिनचर्येमुळे कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे. घरात एकत्र बसून दोन शब्द बोलायला वेळ नसतो, पण बाहेरच्या जगाशी तासंतास संपर्क ठेवला जातो. या बदलत्या जीवनशैलीमुळे पालक आणि मुलांमध्ये दुरावा वाढत असून, त्यातून गैरसमज आणि तणाव निर्माण होत आहेत.
… या गोष्टी नातेसंबंध टिकवून ठेवतात : व्याख्यानातील अत्यंत भावनिक क्षण मुलींच्या पळून जाऊन लग्न करण्याच्या वाढत्या घटनांवर त्यांनी केलेले भाष्य ठरले. एका मुलीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला, की त्या एका क्षणात तिच्या बापाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. ज्या बापाने मुलीला लहानपणापासून जपले, तिच्यासाठी स्वप्ने पाहिली, त्याच्यावर असा निर्णय मोठा मानसिक आघात करतो. पळून जाणे हा कोणत्याही समस्येचा मार्ग नाही. संवाद, विश्वास आणि संयम या तीन गोष्टीच नातेसंबंध टिकवून ठेवतात. कोणताही मोठा निर्णय घेताना पालकांचा विचार करणे, ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे.
सदैव तत्पर : कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय दराडे प्रा. हंकारे यांच्या विचारांचे कौतुक करताना म्हणाले, समाजात अशा वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कृतज्ञता : प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव लादे यांनी, संस्थेच्या २१ वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला. विविध क्षेत्रांत कार्य करत अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम संस्थेने केले असून, कराडकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.











