डिजिटल पद्धतीने ‘जनगणना 2027’ची तयारी वेगात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलन; कराड तालुक्यात ८१६ प्रगणकांची नियुक्ती – तहसीलदार कल्पना ढवळे

कराड/प्रतिनिधी : –

देशातील महत्त्वाच्या जनगणना 2027 प्रक्रियेसाठी व्यापक तयारी सुरू असून, यंदा प्रथमच मोबाईल अॅपद्वारे डिजिटल माहिती संकलन केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार तथा चार्ज अधिकारी कल्पना ढवळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

वेगवान, अचूक आणि पारदर्शक : देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी जनगणना ही प्रक्रिया 1872 पासून सुरू असून, 2027 मधील जनगणना ही 16 वी, तर स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना ठरणार आहे. यंदाच्या जनगणनेत डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार असून, त्यामुळे माहिती संकलन अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक होणार आहे.

पहिल्या टप्पा : जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घर यादी व घरगणना केली जाणार आहे. यामध्ये 1 मे ते 15 मे दरम्यान नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

34 प्रश्नांवरील माहिती संकलन : या माध्यमातून नागरिकांना स्वतःच्या घराची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्तेची माहिती नोंदवता येणार आहे. यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मोबाईल अॅपच्या सहाय्याने 34 प्रश्नांवरील माहिती संकलित करणार आहेत.

दुसरा टप्पा : फेब्रुवारी 2027 मध्ये दुसरा टप्पा पार पडणार असून, या वेळी लोकसंख्येची सविस्तर माहिती – वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, तसेच सामाजिक व आर्थिक बाबी नोंदवल्या जाणार आहेत.

नियुक्ती व प्रशिक्षण : कराड तालुक्यातील ग्रामीण भागासाठी तहसीलदार, तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी यांची चार्ज अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सुमारे 816 प्रगणक आणि 131 पर्यवेक्षक या मोहिमेत कार्यरत राहणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना डिजिटल साधनांचा वापर सुलभ व्हावा, यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी 13 फिल्ड ट्रेनर्सची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना एप्रिल महिन्यात सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षक 27 एप्रिल ते 8 मे या कालावधीत टप्प्याटप्प्याने प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार आहेत.

आवाहन : जनगणना प्रक्रियेदरम्यान गोळा होणारी सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून, ती केवळ सांख्यिकीय उद्देशासाठीच वापरण्यात येणार असल्याची खात्री प्रशासनाने दिली आहे. जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले असून, नागरिकांच्या सहकार्यामुळेच विकास योजनांना योग्य दिशा मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!