हरकतींवरील सुनावणीत दोन्ही अर्ज बाद; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती, २५१ पैकी २०५ अर्ज वैध, २९ अवैध
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवार (दि. ६) रोजी निवडणूक कार्यालयात पार पडली. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या २५१ उमेदवारी अर्जांपैकी १७ अर्ज दुबार असल्याने त्यांसह अन्य १२ अर्ज झाले आहेत. त्यामुळे एकूण अर्जांपैकी २०५ अर्ज वैध ठरले आहेत. तर मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांच्या अर्जांवर घेण्यात आलेल्या हरकतींवर झालेल्या तपासणी आणि सुनावणीत सदरचे दोन्ही अर्ज बाद ठरवण्यात आल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी शुक्रवारी दिली.
सत्ताधारी आणि विरोधी गटाला धक्का : सह्याद्रि साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक, कारखान्याचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे आणि विरोधी गटाचे प्रमुख उमेदवार मानले जाणारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक निवासराव थोरात यांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने दोन्हीही गटासाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे.
अर्जांची छाननी : सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी विक्रमी १५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जांची छाननी गुरुवार (दि. ६) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रीक, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या उपस्थितीत झाली.
२९ अर्ज बाद : गटनिहाय करण्यात आलेल्या अर्जांच्या छाननीत सुरुवातीला दुबार भरण्यात आलेले १७ उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यानंतर कागदोपत्री अपुर्तता व अन्य कारणांमुळे १२ बाद झाले.
मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात यांच्या अर्जांवर हरकती : दरम्यान, गुरुवारी दाखल अर्जांची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर, तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्याची सुनावनी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रीक यांच्यासमोर झाली.
दोन्हीही अर्ज बाद : उमेदवारी अर्जांवरील हरकतींच्या सुनावणीदरम्यान मानसिंगराव जगदाळे व निवासराव थोरात यांच्या बाजूने त्यांच्या-त्यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. त्यानंतर या सुनावणीचा निर्णय रात्री उशीरापर्यंत जाहीर करण्यात आलेला नव्हता. अखेर शुक्रवार (दि. ७) रोजी निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी हरकती घेतलेले मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांचेही अर्ज बाद ठरवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.
आगामी भूमिकांकडे लक्ष : दरम्यान, उमेदवारी अर्जांवरील हरकत, त्यावर झालेली सुनावणी आणि अंतिम निकालामुळे मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात हे दोन्ही उमेदवार समाधानी नसल्याचे त्यांच्या समर्थकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार यानंतर नेमकी काय भूमिका घेणार? सदर सुनावणीबाबत अपील करणार का? याकडे दोघांच्याही समर्थकांसह कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
