‘सह्याद्रि’च्या सभासदांची यशवंत विचारांना साथ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळासाहेब पाटील; समोरच्या बाजूने पातळी सोडून आरोप 

कराड/प्रतिनिधी : – 

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीस आम्ही आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांच्या पी. डी. पाटील पॅनलच्या माध्यमातून सामोरे गेलो. यात यशवंत विचारांच्या सभासदांनी चांगल्या प्रकारे साथ देत मतरुपी कौल दिला असून आपली निर्णायक विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे मत माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

मतमोजणी केंद्रास भेट : सह्याद्रि कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर रविवारी सायंकाळी बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

४२०० पेक्षा जास्त मतांची आघाडी : श्री. पाटील म्हणाले, या निवडणुकीची पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ४२०० पेक्षा जास्त मतांची पी. डी. पाटील पॅनेलला आघाडी मिळाली आहे. तसेच सध्या दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल हाती यायला वेळ लागणार आहे. परंतु, पहिल्या फेरीपेक्षा जास्त मतांची आघाडी आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या निवडणुकीत कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी आपल्यावर चांगला विश्वास दाखवला आहे.

यशवंत विचारांना सहकार्य : विरोधकांचा समाचार घेताना श्री. पाटील म्हणाले, अत्यंत चांगल्या वातावरणात ही निवडणूक पार पडली. मात्र, समोरच्या बाजूने पातळी सोडून आरोप होत असताना आमच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संयम ठेवला. आमच्यावर यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. त्याच संस्कारात आम्ही वाढलो असून त्यांचा विचार पुढे नेण्याचे काम केले आहे. त्याला सर्वांनी सहकार्य केले, त्या सर्व सभासद मतदारांप्रति ऋणही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!