बाळासाहेब पाटील; कराडमध्ये जल्लोष व विजयी सभा उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना हा स्व. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेतून स्थापन झाला आहे. परंतु, त्याच कारखान्याकडे बघून तुम्ही शड्डू ठोकला होतात. तो शड्डू आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या विचारांना ठोकला होता. त्या प्रवृत्तीला सभासदांनी मतदान व निकालाच्या माध्यमातून कारखान्यात येण्यापासून रोखले आहे. त्यामुळे हा विजय आपण यशवंत विचारांच्या सभासदांसाठी समर्पित करत असल्याचे प्रतिपादन माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
विजयी आभार सभा : सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीत विजयश्री मिळवून निर्विवाद सत्ता मिळवल्यानंतर आयोजित विजयी आभार सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी पी. डी. पाटील पॅनेलच्या विजयी उमेदवारांसह माजी सभापती देवराज पाटील, अजितराव पाटील – चिखलीकर, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभासदांची दिशाभूल : यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, सह्याद्रि कारखान्यावर कोणतेही कर्ज नसताना दिशाभूल करून सभासदांमध्ये संभ्रमावस्था पसरवण्याचे काम विरोधकांनी केले. मात्र, त्या प्रवृत्तीलाही या निमित्ताने सभासदांनी कारखान्याच्या बाहेर ठेवली आहे.
कराड : विजय सभेस झालेली पी. डी. पाटील पॅनलच्या समर्थक समर्थक सभासद, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी.
झेडपी, पंचायत समिती, नगरपालिकेसाठी सज्ज व्हा : आता यापुढच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांनामध्येही याच जोमाने लढून त्या जिंकायच्या आहेत, त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अर्थकारणातून राजकारण करण्याची प्रवृत्ती : अलीकडच्या काळात अर्थकारणातून राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढते आहे, असे सांगत श्री. पाटील म्हणाले, त्यामुळे ती प्रवृत्ती कारखान्याला, सभासदांना व शेतकर्यांनाही धोकादायक आहे. ती हुकूमशाहीची प्रवृत्ती सुज्ञ सभासदांनी वेळीच रोखली आहे, याचे आपल्याला समाधान आहे.
पुतळा हटवण्याची भाषा करता! : कारखान्याबाबत खासगीत बोलताना तुम्ही कोणतीच पात्रता ठेवत नाही, असे सांगत श्री. पाटील म्हणाले, कारखाना, नगरपालिकेत आयुष्य खर्ची घातलेल्या ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचा पुतळा कर्मचारी, अधिकार्यांनी त्यांच्याच घामाच्या पैशातून कारखान्यात उभा केला आहे. तो हटविण्याच्या गोष्टी तुम्ही खासगीत बोलता. मात्र, लक्षात असू द्या, कारखाना आणि नगरपालिकेतील पुतळा ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्यावर प्रेम करणार्या अधिकारी, कर्मचार्यांनी त्यांच्या खिशातून पैसे घालून उभारला आहे. त्यामुळे तुमची प्रवृत्ती ओळखून ती सभासदांनी नाकारली आहे. शेतकर्यांच्या हिताचा विचार करणार्या आपल्या पॅनेलला मोठ्या मताधिक्याने विजयी केले असल्याचे त्यांनी संगितले.
मनोगत : यावेळी जशराज पाटील, देवराज पाटील, श्री. चिखलीकर, माजी नगराध्यक्ष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रशांत यादव, सूत्रसंचालन जयंत बेडेकर यांनी केले.