बाळासाहेबांना सभासद मावळ्यांची साथ; विरोधकांना फंद-फितुरीचा फटका, उत्तरेचे मतदारच किंगमेकर
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब आणि त्यांच्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी सक्षमपणे कारखान्याची धुरा सांभाळली. या जवळपास ५४ वर्षांत ‘सह्याद्रि’ने अनेक पुरस्कार पटकावले, उच्चांकी दर दिला, सहकारात नावलौकिक मिळवला. यांमुळे अपवाद वगळता अनेकदा निवडणुका बिनविरोध झाल्याने ‘सह्याद्रि’ अभेद्य राहिला. परंतु, कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक तिरंगी करून या गडाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सहकारात अनेक पावसाळे पाहिलेल्या जाणकार सभासदा मावळ्यांनी बाळासाहेबांची पाठराखण केल्याने ‘सह्याद्रि’चा गड अभेद्यच राहिला आहे.

राजेंद्र मोहिते/कराड : –
तिरंगी लढत : सह्याद्रि कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा सभासद मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तिरंगी लढत झाली.
सत्ताधाऱ्यांची कोंडी : दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा फिव्हर पाहता ‘सह्याद्रि’ सहजासहजी काबीज करता येईल, या उद्देशाने विरोधक कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे, रयत संघटनेचे उदयसिंह पाटील – उंडाळकर, तसेच दुसऱ्या आघाडीचे निवासराव थोरात, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांनी सत्ताधारी माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.
आरोप – प्रत्यारोप : या निवडणुकीत तिन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार झाला. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यांमुळे बिनविरोधची परंपरा असलेल्या पाच तालुक्यांच्या कार्यक्षेत्रातील ‘सह्याद्रि’चे सभासद खडबडू जागे झाले. या तिरंगी लढतीमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या या निवडणुकीत विक्रमी ८१ टक्के मतदान झाले.
प्रचाराचे प्रमुख मुद्दे : दरम्यान, प्रचार सभांमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची दुखती नस दाबण्याचा प्रयत्न केला. विरोधी गटाच्या सभासदांचा ऊस उशिरा न्हेने, त्यांच्या मयत वारस नोंदी रखडवणे, कामगारांना परमनंट न करणे आदींना त्यांनी प्रचाराचे प्रमुख मुद्दे बनवले.
निवडणुकीत टशन : यांत कराड उत्तरसह कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच टशन होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
सहकाराचा मेरु : विरोधकांमध्ये ‘सहकाराचा मेरु’ संबोधन्यासारखा शाश्वत चेहरा दिसला नाही, असे मत अनेक ज्येष्ठ जाणकार सभासदांकडून व्यक्त केले गेले. कदाचित याच विचारांतून मिळालेला मतरुपी कौल बाळासाहेबांच्या पथ्यावर पडला असावा, हे ‘सह्याद्रि’च्या निकालातून स्पष्ट होते.
विरोधकांत एकमत नाही : या निवडणुकीसाठी पॅनेल तयार करण्यापासून अर्ज दाखल करणे, अर्ज माघारी घेणे, तोडजोडीअंती एकास एक उमेदवार देणे, वेळप्रसंगी क्रॉस वोटिंग करणे यांमध्ये शेवटपर्यंत विरोधकांचे एकमत झाले नाही.
फुटीचा फायदा पथ्यावर : परिणामी, या फुटीचा फायदा बाळासाहेबांच्या पथ्यावर पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, दोन्ही विरोधी पॅनेल आणि विजयी पॅनेल यांच्या मतांची गोळा बेरीज पाहता विजयी पी. डी. पाटील पॅनल सर्वांर्थाने वरचढ ठरल्याचे या निकालातून दिसून आले. विरोधकांचा २१ शून्य असा झालेला दारुण पराभव नोंद घेण्यासारखाच आहे.
सेनापतीविना लढले सैन्य…
सह्याद्रि कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापले डावपेच खेळायला सुरुवात केली. त्यामध्ये सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक, कराड उत्तरचे जेष्ठ नेते मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर विरोधकांनी हरकत घेतली. पडताळणीत त्यांचा अर्ज बाद झाला. मात्र, पी. डी. पाटीलसाहेब यांच्यापासून सोबत असलेले मानसिंगराव जगदाळे हे एकप्रकारे सत्ताधाऱ्यांचे सेनापतीच. त्यांना मानणारा मोठा वर्ग उत्तरेत आहे. मात्र, विरोधकांनी त्यांनाच जायबंदी केल्यामुळे सेनापतींविना लढलेल्या स्वाभिमानी सैन्याने विरोधकांचा ‘सह्याद्रि’ काबीज करण्याचा डाव हाणून पाडला.
विरोधकांचे ‘राजा’वर एकमत नाही
‘सह्याद्रि’च्या सभासदांमध्ये काही कारणांवरून खदखद होती, हे विरोधकांनी हेरले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे सरदार गळाला लावून ‘सह्याद्रि’ला खिंडार पडण्याचा विरोधकांनी चंग बांधला. मात्र, केवळ एक-दोन जागांसाठीच एकमुखी आघाडी फुटल्याची आवई उठवत विरोधकांनी सावता सुभा मांडत ‘सह्याद्रि’वर खाजगी मोर्चे लावले. एकमेकांवर कुरघोड्या केल्या. मात्र, यामध्ये ‘राजा’ कोण होणार? यावर एकमत न झाल्यानेच विरोधकांमध्ये फाटाफूट झाल्याचे जाणकारांकडून बोलले गेले. कदाचित, विधानसभेप्रमाणे विरोधकांनी एकत्रित लढा दिला असता, तर सभासदांनाही शाश्वतता वाटली असती. अखेर, स्वाभिमानी सभासदांनी सहकारावर गुलाल उधळला.
