उंडाळे पाणीपुरवठा योजनेसाठी ७० लाखांच्या निधीची मागणी; पालकमंत्र्यांची तात्काळ मंजुरी
कराड/प्रतिनिधी : –
सातारा जिल्ह्यातील टंचाई प्रश्नांबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडली. या बैठकीत कराड दक्षिणमधील पाणी टंचाई प्रश्नांबाबत आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत, या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे आणि जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. उंडाळे पाणीपुरवठा योजनेसाठी ७० लाखांच्या निधीची मागणी आक्रमकपणे आ.डॉ. भोसले यांनी या बैठकीत मांडली.
मागणीची दखल : या मागणीची पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी गांभीर्याने दखल घेत, हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी फलटणचे आ. सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपयोजनांबाबत सूचना : पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील टंचाई प्रश्नांचा व्यापक आढावा घेण्यात आला. तसेच आगामी टंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांबाबत शासकीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.












