आ. डॉ. अतुलबाबा भोसले; कराड बसस्थानक परिसराची पाहणी, प्रशासनास दिल्या सूचना
कराड/प्रतिनिधी : –
कराड शहर हे मध्यवर्ती ठिकाण असून येथील बसस्थानकात प्रतिदिवस ४० हजार प्रवास्यांची वर्दळ असते. त्यानुसार विद्यार्थिनी, महिला प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही आदी उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात बस स्थानक व पोलीस प्रशासनास आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
बसस्थानकास भेट : पुणे (स्वारगेट) येथील बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड बसस्थानक परिसराची आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली.
उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, कराड आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विविध समस्यांबाबत चर्चा : यावेळी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड बसस्थानक आगारातील बंद अवस्थेत असलेल्या बसेस, बस स्थानकातील पोलीस चौकी, कॅन्टींग, चालक-वाहक निवासव्यवस्था आदींची पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यादृष्टीने कराड आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ, बसस्थानक प्रशासन व चालक-वाहकांशी चर्चा करण्यात आली. तसेच यासंदर्भात ठोस उपयोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

धोरण ठरवून आराखडा तयार करणार : कराड बसस्थानक परिसरात कोणतीही अनुचित घटना वा चोरीच्या घटना घडून नयेत, यासाठी पोलीस प्रशासन व बसस्थानक प्रशासनास विश्वासात घेऊन लवकरच याबाबत एक धोरण ठेवून त्यानुसार आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे माध्यमांच्या प्रश्नावर बोलताना आ. भोसले यांनी सांगितले.
40 हजार प्रवाशांची वर्दळ : या बस स्थानकात दररोज 40 हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्या सोयी, सुविधांसाठी लवकरच एक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे आ. भोसले यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात बसस्थानक प्रशासनाची शासकीय विश्रामगृहात एक आढावा बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांची दुरवस्था असून ते व्यवस्थित केली जातील. तसेच सीएसआर फंडातून प्रवास्यांना पिण्याच्या पाण्याचा कुलर उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रशासन कटिबद्ध : महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत व पोलिसांच्या अनुपस्थितीबाबतच्या प्रश्नावर आ. भोसले म्हणाले, महिला, प्रवासी नागरिकांनी बसस्थानकातील एखाद्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागितल्यास, त्यांना ते तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असले पाहिजे.
सीसीटीव्हीचा प्रस्ताव : बसस्थानक व परिसरात अपुरे सीसीटीव्ही आहेत. याबाबत बसस्थानक प्रशासनाकडून आणखी किती सीसीटीव्ही कॅमेरे लागतील, याबाबतचा प्रस्ताव मागविला आहे. तो मिळाल्यानंतर त्यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. तसेच बसस्थानक निर्मितीवेळी पोलिसांसाठी करण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणीच पोलिसांनी बसावे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 24 तास उपलब्ध रहावे, यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून त्याची काटेकोर अंमलबजावणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छतेबाबत उपाययोजना : तसेच बसस्थानक व परिसराची स्वच्छता राखण्याबाबतही उपाययोजना करण्यात येणार आहेत. शिवाय बसस्थानकासमोर अतिक्रमण असल्यास ते हटवण्याच्या दृष्टीने तात्काळ नगरपालिका, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना सूचना देण्यात येतील, असेही आ. डॉ. भसले यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
बसस्थानक आदर्शवत नसल्याची खंत
कोट्यावधींचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या बसस्थानकात नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या प्रश्नावर आ. भोसले म्हणाले, बस स्थानकातील प्रवाशांसह नागरिकांच्या अनेक तक्रारींचे अवलोकन यापूर्वीच केले आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत त्याचे निरसन करण्याच्या दृष्टीने पावले टाकणार आहोत. परंतु, राज्य सरकारने एवढा मोठ्या प्रमाणात निधी देऊनही ज्या दर्जाचे बसस्थानक व्हायला हवे होते, ते झाले नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच बसस्थानक आदर्शवत करण्यासाठी काही कठोर पावले टाकणार असल्याचेही आ. भोसले यांनी यावेळी सांगितले.
