‘कृष्णा’तर्फे सेवाभावी वृत्तीचे महाराष्ट्रात नवे मॉडेल तयार करणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. डॉ. अतुल भोसले; उपजिल्हा रुग्णालय नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना

कराड/प्रतिनिधी : –

कराडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील सर्व विभागांना आवश्यक तज्ञ डॉक्टर्स कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने देण्याचा नवीन उपक्रम राबवणार आहोत. याबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत आपली फोनवर चर्चाही झाली असून या माध्यमातून महाराष्ट्रात कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीचे एक नवे मॉडेल तयार करणार असल्याचे आ. डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

पाहणी व आढावा बैठक : आ. डॉ. अतुल भोसले यांनी शुक्रवारी दुपारी येथील सौ. वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. तसेच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णालयातील विविध सुविधा व कामकाजाचा आढावा घेतला. त्याचबरोबर रुग्णालयाच्या नूतनीकरणासंदर्भात एक सखोल आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता लाळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी, तसेच प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक राजेंद्र माने आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मागणी : या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आ. डॉ. भोसले म्हणाले, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने तालुका व जिल्हा स्तरावर कृष्णा विश्व विद्यापीठाने काही तज्ञ डॉक्टर्स व वैद्यकीय शिक्षण घेणारे पदव्युत्तर विद्यार्थी पुरवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आपण कृष्णाच्या माध्यमातून २० पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी उपजिल्हा रुग्णालयाला देणार आहोत.

‘कृष्णा’चे एक पाऊल पुढे : तसेच आपण एक पाऊल पुढे जात यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून कराडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक त्या सर्व विभागांना तज्ञ डॉक्टर्स पुरवणार सांगत आ. डॉ. भोसले म्हणाले, सेवाभावी वृत्तीने आपण ही सेवा देणार असून त्यासाठी शासनाला कोणतेही वेतन किंवा मानधन द्यावे लागणार नाही. ते सरकार व लोकांची विनामूल्य सेवा करतील. यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्याची विनंती आपण आरोग्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न : उपजिल्हा रुग्णालयाला उर्जितावस्था मिळण्यासाठी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून हॉस्पिटलच्या नूतनीकरनासंदर्भात सखोल आराखडा तयार करण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे सांगत आ. डॉ. भोसले म्हणाले, लवकरच हा आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.

१०० बेडचे ट्रामा केअर सेंटर : तसेच येथे १०० बेडच्या हॉस्पिटलमध्ये आधुनिक ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न असल्याचे सांगत आ. डॉ. भोसले म्हणाले, पुणे-बंगलुरु महामार्ग लगत असलेल्या कराड शहरात आधुनिक ट्रामा केअर सेंटर असणे गरजेचे आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना आपण प्रशासनात दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करणार : त्याचबरोबर माता-बालक आरोग्य योजनेच्या माध्यमातून १०० बीडची नवीन इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. काही कारणास्तव याचे बांधकाम धीम्या गतीने सुरू असून अपूर्ण काम पूर्ण करण्यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच येथील स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डीपीडीसीच्या माध्यमातून एक कोटी २१ लाखांचा लाखांची कामे करण्यात येणार आहेत. या संदर्भात नियोजन अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे आ. डॉ. भोसले यांनी सांगितले.

रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसंदर्भात आपण विधानसभेत आरोग्यमंत्र्यांच्या समोर आपले मत मांडले आहे. त्यादृष्टीने रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्यास एका प्रश्नावर बोलताना आ. डॉ. भोसले यांनी सांगितले..

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे

येथील वैद्यकीय व्यवस्था सुधारण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार आहेत. परंतु, आरोग्य विभागाच्या शासकीय पदावर बसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही जबाबदारीने काम केले पाहिजे, असेही आ.डॉ. भोसले यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!