निवासराव थोरात; वारुंजीतील ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीत निर्णय
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वारुंजी (ता. कराड) येथे ऊस उत्पादक सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सह्याद्रिची निवडणूक सर्व ताकदीनिशी सर्वांना सोबत घेवून लढण्याचा एकमुखी निर्धार घेण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी दिली.
सभासद बैठक : वारुंजी (ता. कराड) येथे कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ऊस उत्पादक सभासदांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.
सभासदांनाच विरोधक ठरवले : श्री थोरात म्हणाले, ३० वर्षे विद्यमान चेअरमन यांच्याच हातात एकहाती कारभार आहे. तरीदेखील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहतो. ज्या सभासदांनी चेअरमन यांना एकहाती बिनविरोध सत्ता देऊनही न्यायासाठी दाद मागणाऱ्या सभासदांना ते विरोधक ठरवत आहेत.

एकाधिकारशाहीकडे वाटचाल : स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेवून प्रायव्हेट लिमिटेडकडे वाटचाल सुरु असल्यानेच निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागत आहे. स्व. चव्हाण साहेबांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करायचे धोरण आणले होते. मात्र, इथे सत्तेचे केंद्रीकरण करून एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचे श्री थोरात यांनी सांगितले.
राजकारणाचा अड्डा उधळून लावणार : कारखान्यातील राजकारणाचा अड्डा उधळून लावून सर्व सभासदांना समान व सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठीच आपल्याला ही निवडणूक लढवायची असल्याचे सांगत श्री थोरात म्हणाले, जे जे समविचारी सभासद, शेतकरी बांधव सोबत येतील; त्या सर्वांना सोबत घेवून सह्याद्रिची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही नेत्यांनी मार्गदर्शन करावे : प्रास्ताविक अमित जाधव म्हणाले, सह्याद्रिच्या निवडणूकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील या दोन नेत्यांच्या एकत्रित मार्गदर्शनाखाली निवडणूक व्हावी, असा सूर आळविला.
उशिरा ऊस तुटल्याने नुकसान : कोयना दूध संघाचे चेअरमन प्रा. लक्ष्मण देसाई मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सुपने-तांबवे विभागात गेल्या १०-१५ वर्षांपासून ऊसतोडीसाठी दरवर्षी टोळ्यांची कमतरता भासते. ऊस उशिरा तुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने सह्याद्रित आता परिवर्तन अटळ आहे.
…यांना विजय समर्पित करूया : बाबुराव पवार म्हणाले, आम्ही २००९ पासून संघर्ष करत आहोत. आता परिवर्तनाची वेळ आली आहे. सभासदांनी एकजूट दाखवून सह्याद्रित परिवर्तन करुन हा विजय स्व. विठ्ठलराव तात्या आणि हिंदूराव साहेबांना समर्पित करावा.
सर्वांना सोबत घ्या : प्रकाश पाटील-कोपर्डेकर यांनी जे सोबत येतील, त्या सर्वांना सोबत घेवून सह्याद्रित परिवर्तन करून सर्व सभासदांना समान न्याय देणार असल्याची ग्वाही दिली.
उपस्थिती : याप्रसंगी संग्राम पवार, शिवाजी चव्हाण, रविंद्र शिंदे, सचिन जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिकेत पवार, दत्ता पाटील यांनी आभार मानले.
