उंडाळकरांच्या हातात घड्याळ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रयत संघटनेची वेळ बदलणार; कार्यकर्त्यांनाही मिळणार बळ 

तब्बल ३५ वर्ष निष्ठेने कराड दक्षिणचा बालेकिल्ला राखणाऱ्या दिवंगत नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांनी शरद पवारांच्या घड्याळाला सातत्याने हात दाखवला. परंतु, काकांच्या नंतर कालानुरूप दक्षिण मांडेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. तसेच बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी काकांचे सुपुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी अखेर आपल्या हातात शरद पवारांचे पुतणे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतल्याने कराड दक्षिणच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. 

राजेंद्र मोहिते/कराड : – 

काकांनी बांधली ‘रयत’ची मोट बांधली : कराड दक्षिणचे राजकारण करताना संपूर्ण सातारा जिल्ह्यावर आपला वचक ठेवणारे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी राजकारण करतानाच रयत संघटनेची मोट बांधली.

दोन वेळा अपयश : २०१४ मध्ये काकांनी याच संघटनेच्या माध्यमातून अपक्ष लढविलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत संघटनेच्याच माध्यमातून लढलेल्या अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनाही अपयश आले.

कार्यकर्ते, शिलेदारांनी सोडली साथ : काँग्रेसच्या चिन्हाशिवाय लढलेल्या या दोन्ही निवडणुकांत रयत संघटनेचा कस दिसून आला. काकांच्या राजकीय उत्तरार्धात काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी, तर त्यांच्या पश्चात अनेक शिलेदारांनी संघटनेचे साथ सोडली. त्यामुळे संघटनेचा दक्षिणेतील राजकीय धबधबा काहीसा कमी झाल्याचे अनेक निवडणुकांमधून दिसून आले.

रयत संघटनेची वेळ बदलणार : यातच बदलत्या राजकीय समीकरणांनुसार वाटचाल करण्यासाठी उदयदादांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे रयत संघटनेची वेळ आता बदलणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

कार्यकर्त्यांना बळ : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत ते अगदी सोसायट्यांपर्यंत कार्यकर्त्यांना निश्चितच बळ मिळणार आहे, यात शंका नाही.

आज पक्षप्रवेश : आज शनिवार (दि. १९) एप्रिल २०२५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रयत संघटनेच्या तब्बल दहा हजार कार्यकर्त्यांसह अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत.

दक्षिणेचे लक्ष : या पक्षप्रवेश सोहळ्याकडे रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार, नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

आगामी निवडणुकांत लागणार कस

अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह कराड व मलकापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये रयत संघटनेसह अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर त्यांच्या नवनिर्मित अजित पवार राष्ट्रवादी गटाचा कस लागणार आहे. या निवडणुकांमध्ये त्यांना कितपत यश येईल, यांवरून त्यांची विधानसभेची वाटचाल ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. 

संस्थांना मिळणार बळकटी

उंडाळकर यांच्या ताब्यात असलेल्या सध्याच्या कराड शेती उत्पन्न बाजार समिती व खरेदी-विक्री संघासह कोयना बँक, शामराव पाटील पतसंस्था, कोयना दुध संघ, ग्रामीण शिक्षण संस्था आदी संस्थांनाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे बळकटी मिळणार असल्याची चर्चा आहे. 

तरुण कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज 

विलासकाकांनी कराड दक्षिणमधील गावागावासह खेडोपाडी, वाडी, वस्त्यांवर फिरून रयत संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोट बांधली. यातील काही कट्टर कार्यकर्त्यांनी अखेरपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. त्यानंतर ही संघटना राखून ठेवण्यात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना काहीअंशी अपयश आल्याचे बोलले गेले. त्यामुळे आता बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार आगामी राजकीय वाटचालीला दिशा देण्यासाठी उदयदादांनीही अवघा दक्षिण पिंजून काढत नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून तरुण कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!