रिमांड होमला उत्कृष्ट बाल निरक्षणगृह पुरस्कार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची माहिती; संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल

कराड/प्रतिनिधी : –

येथील कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह/निरीक्षणगृह (रिमांड होम), कराड या संस्थेला उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय नामांकनासह महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचा उत्कृष्ट बाल निरीक्षण गृह पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

पत्रकार परिषद : सदर पुरस्काराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेची बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पवार, सदस्य सत्यनारायण मिनियार, मोहनराव पाटील, तानाजी पाटील, प्रकाश पालकर, विनोद सावंत, विजय भोसले, संस्थेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिखर परिषदेत सन्मान : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास आयुक्तालय पुणे व आंतरराष्ट्रीय मिरकॅल फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने कौटुंबिक बळकटीकरण व कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रणाली बळकटीकरण आणि अंमलबजावणीसाठी कराडच्या या संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन गत आठवड्यात दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शिखर परिषदेत या संस्थेला राष्ट्रीय नामांकन दिल्याचे प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले. 

पुरस्काराने सन्मान : महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाच्या वतीने राज्यभरात बालकांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना देण्यात येत असलेला यावर्षीचा उत्कृष्ट बाल निरीक्षणगृह पुरस्कार जाहीर झाल्याचेही याप्रसंगी श्री म्हेत्रे यांनी सांगितले. 

65 वर्षांपासून उत्तम कार्य : रिमांड होम ही संस्था समाजातील अनाथ निराधार बालकांचा गेली 65 वर्ष संगोपनाचे उत्तम कार्य करीत असल्याचे सांगत श्री म्हेत्रे म्हणाले, सध्या या संस्थेत 35 विद्यार्थी असून चालू वर्षी या संस्थेतून 14 बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिली आहे. अठरा वर्षानंतर या संस्थेतून घरी गेलेल्या बालकांसाठी शासनाकडून बालसंगोपन योजना अंतर्गत 2550 रुपये प्रति महिना तसेच या बालकांच्या प्रायोजक्तासाठी प्रति महिना चार हजार रुपये दिले जातात.

यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून स्थापना : या संस्थेला शहर व परिसरातील दानशूर व्यक्ती, थोर देणगीदार, सामाजिक कार्यकर्ते आपल्या परीने योग्य ती मदत नेहमीच करत असतात. त्यामुळे प्रत्येक बालकाला प्रेमळ कुटुंब मिळाले पाहिजे, या उद्देशाने ही संस्था बालकांची योग्य काळजी व संगोपन करीत असल्याचे सांगत श्री म्हेत्रे म्हणाले, 1959 रोजी राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून या बालगृहाची कराड येथे स्थापना करण्यात आली. या बालगृहाच्या पहिल्या कार्याध्यक्ष म्हणून स्व. वेणूताई चव्हाण यांनी काम पाहिल्याचेही श्री म्हेत्रे यांनी सांगितले.

मिशन वात्सल्य योजना : या बालग्रह, निरीक्षणगृह संस्थेस पूर्वी शासनाकडून अल्प प्रमाणात अनुदान मिळत होते. परंतु, सद्यस्थितीला मिशन वात्सल्य योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्या माध्यमातून एका बालकास 3 हजार रुपये प्रति महिना अनुदान मिळत असल्याचे श्री म्हेत्रे यांनी सांगितले.

सहा हजार विद्यार्थी : या संस्थेमधून आजअखेर 6 हजार विद्यार्थी बाहेर पडून आपले पुढील आयुष्य व्यतीत करीत आहेत. बहुसंख्य विद्यार्थी हे आपल्या जीवनात यशस्वी झाले असून काही माजी विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय करत आहेत. तर काही नोकरी निमित्ताने बाहेर वास्तव्यास आहेत, हे माजी विद्यार्थी कराडमध्ये आल्यानंतर या संस्थेस आवर्जून भेट देत असतात, असेही श्री म्हेत्रे यांनी सांगितले. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!