शिलालेख ११९ वर्षे जुना; समाधीविषयी माहिती उजेडात
कराड/प्रतिनिधी : –
बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पाठीमागील खासगी जागेत समाधीवर एक शिलालेख आढळून आला आहे. प्रत्यक्ष उल्लेख नसला, तरी हा शिलालेख ब्रिटिश कालखंडातील आहे. तो जवळपास ११९ वर्षे जुना असून गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचा उल्लेख यामध्ये आला आहे.
शिलालेख वाचन : शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांनी केले. हा शिलालेख दोन भागात असून वरील भागात पाच ओळी, तर खालील भागात सात ओळी ह्या देवनागरी लिपीत आहेत.
शिलालेखाचा अर्थ व विश्लेषण : या शिलालेखाचा अर्थ व सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे; बेलवडे बुद्रुक येथे असणारी समाधी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती स्व. बाळाराम बापूजी मोहिते पाटील यांची आहे. शिलालेखाच्या वरील भागात त्यांचे निधन शके १८२६ कार्तिक शुध्द १ मंगळवार रोजी झाले. म्हणजे तारीख ८ नोव्हेंबर १९०४ रोजी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे समाधी १२ मे १९०५ रोजी पूर्ण झाल्याचे तारखेवरून समजून येत आहे. बाळाराम मोहिते यांची समाधी त्यांच्या कुटुंबातील श्रीपती यांनी स्वखर्चाने बनवली. श्रीपती हे बाळाराम मोहिते यांचे नातू.
समाधीस त्याकाळी आलेला खर्च : समाधी विठू नावाच्या पाथरवट म्हणजेच दगडी काम करणाऱ्या कारागिराने तयार केली. ही समाधी शके १८२६ साली तयार झाली असून त्यासाठी २०० रुपये खर्च आला, अशी माहिती शिलालेखामधून मिळत आहे. समाधीवरील सालामुळे प्रत्यक्ष उल्लेख नसला, तरी हा शिलालेख ब्रिटिश कालखंडातील स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांनी दिली.
सहकार्य : यासाठी इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे, विक्रम पाटील, शिवाजीराव मोहिते, राहुल मोहिते यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिलालेख वाचन :
वरील भाग
१ . Il श्रीमंत ll
२ . ही समाध बाळाराम बापुजी
३ . मोहिते पा. यांचा(ची) काल शके १८२६
४ . कार्तिक शुध ११ रोज(जी) मंगळवार ते दि-
५ . वसी तारा(तयार) केल सन १२-०५-१९०५ ll
खालील भाग
१ . ही समाध शके १८२६
२ . साली …. बाळारा
३ . म पाटील मोहिते
४ . श्री पदी ऐवज मदे || तया
५ . स खर्च रुपय २०० आला
६ . आहे. हे काम विठू पा-
७ . थरव्ट याने केले.
समाधीवरील शिलालेख ब्रिटिश कालखंडातील असून तो जवळपास ११९ वर्षे जुना आहे. अशाच प्रकारचा शिलालेख लगतच्या कासारशिरंबे गावातही आढळला असून लवकरच त्याचेही वाचन करण्यात येणार आहे. तसेच कराड तालुक्यातील काही गावांमध्येही जुने शिलालेख आढळले असून तेही उजेडात आणण्याचा प्रयत्न आहे.
– अतुल मुळीक (इतिहास अभ्यासक)