उपमुख्यमंत्री अजित पवार; अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
कराड/प्रतिनिधी : –
सातारा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणार्या यशवंतराव चव्हाण साहेबांची ही कर्मभूमी आहे. चव्हाण साहेब हे राष्ट्रवादीचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी राज्यात सहकार, पुरोगामी विचार रुजवला. काँग्रेसच्या माध्यमातून नेतृत्व करताना दिवंगत विलासकाकांनीही तोच यशवंत विचार आयुष्यभर जपला. आज तीच विचारधारा जपणारे काकांचे वारसदार अॅड. उदयसिंह पाटील आमच्या राष्ट्रवादीसोबत आल्याने हा खर्या अर्थाने यशवंत विचारांचा प्रीतिसंगम झाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा : कराड येथे रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, रयत संघटनेचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी त्यांच्या रयत संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : व्यासपीठावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, महिलाध्यक्ष सोनाली पोळ, कार्याध्यक्ष संजय देसाई, प्रदीप विधाते, सीमा जाधव, विजयसिंह यादव, राजेश पाटील-वाठारकर, जितेंद्र डुबल, सादिक इनामदार, प्रा. धनाजी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विलासकाकांचा दबदबा : दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाकांच्या जिल्ह्यावर असलेला दबदबा सांगताना ना. पवार म्हणाले, विलासकाकांसोबत मी राज्यसभा, जिल्हा बँक, मंत्रीमंडळात काम केले आहे. काकांचा जिल्ह्यावर दीर्घकाळ वचक होता. त्यांनी जिल्हा बँकेला अनेक पुरस्कार मिळवून दिले. आज देशात सातारा जिल्हा बँक एक नंबरची बँक आहे, ही काकांची देण आहे.
…तर निकाल वेगळा असता : २०१४ मध्ये काँग्रेसने काकांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उभं राहण्याची भूमिका घेतली. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असल्याने आम्ही काकांची समजूत काढण्याचा प्रयत्न असल्याचा सांगताना ना. अजितदादा पवार म्हणाले, परंतु, काका त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यावेळी जर काकांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली असती तर; त्यावेळचा निकाल वेगळा लागला असता, असे विधानही त्यांनी यावेळी केले.
उदयसिंहांना वारसा चालवायचाय : काकांनी सहकाराचे राजकारण केले. आज त्यांचाच वारसा उदयसिंहांना पुढे चालवायचा आहे, असे सांगताना ना. पवार म्हणाले, काकांनी निर्माण केलेल्या सर्व संस्था आज आदर्शवत कार्यरत आहेत. त्यांनी निर्माण केलेली संघटना उदयसिंहांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
निर्णय चुकू देणार नाही : उदयसिंहांनी घेतलेला निर्णय कोणत्याही परिस्थितीत चुकू देणार नाही, असे सांगत ना. पवार म्हणाले, उदयसिंह पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्व प्रकारची ताकद देणार आहे.
आबांची साद, दादांचा प्रतिसाद : मकरंदआबा पाटील उदयदादांना साद घातली. त्याला दादांनीही प्रतिसाद दिला. त्यामुळे उदयसिंह पाटील यांना राष्ट्रवादीत योग्य तो मान, सन्मान देण्याचे काम करेन. हा माझा शब्द आहे, अशी ग्वाहीही ना. पवार यांनी यावेळी दिली.
यशवंत विचारांचे नेते म्हणून ओळख : विलासकाकांनी ३५ वर्षे जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण केले. यशवंत विचार माणणारे नेते म्हणून काकांची ओळख होती, असे सांगताना मंत्री मकरंद पाटील म्हणाले, विलासकाका आणि लक्षणराव तात्यांनी जिल्ह्यावर अनेक वर्ष काम केले. काकांनी दूरदृष्टीने वाकुर्डेसारखा राज्यातील पहिला नदीजोड प्रकल्प केला. आज काकांच्या पश्चात त्यांची रयत संघटना उदयदादांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
काँग्रेसमध्ये काय मिळाले? : दादांना काँग्रेसमध्ये काय मिळाले, हे मी विचारणार नाही, असे म्हणत मंत्री पाटील म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तुमच्यावर कधीही पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
…हे फक्त अजितदादाच देऊ शकतात : एका कुटुंबात खासदार आणि मंत्रिपद फक्त अजितदादाच देऊ शकतात. दादा दिलेला शब्द कधीही माघार घेत नाहीत. त्यामुळे उदयदादांनी निर्धास्त रहावे, अशा विश्वासही मंत्री पाटील यांनी उदयदादा व त्यांच्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला.

काकांनी पुरोगामी विचार जोपासला : दिवंगत विलासकाकांनी शेवटपर्यंत आपली विचारधारा सोडली नाही. ६०-६५ वर्षे पुरोगामी विचार जोपासला, असे सांगत उदयसिंह पाटील म्हणाले, तीच विचारसरणी अबाधित ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे पक्ष प्रवेशासारखा निर्णय घेणे माझ्यासाठी तेवढे सोपे नव्हते.
काका आणि तात्यांनी जिल्ह्याची घडी बसवली : बदलत्या परिस्थितीनुसार पुढे जावे, संघटना टिकवावी, असे मकरंद आबांनी सांगितले. विकासासाठी कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे काकांनी ६०-६५ वर्षे उभाकेलेल्या संघटनेला संरक्षण देण्याची मागणी आपण ना. अजितदादांकडे केली. काकांनी प्रस्थापिताविरोधात संघर्ष केला. परंतु, काका आणि तात्यांनी जिल्ह्यात विकासाची घडी बसवली. त्यांचे राजकीय प्रवाह वेगळे असले, तरी वैचारिकरित्या ते एकत्रच होते, असे उदयसिंह पाटील यांनी सांगितले.

काकांना कौटुंबिकरित्या अडचणीत आणले : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काकांनी ३५ वर्ष नेतृत्व केले. त्यांनी शेवटपर्यंत काँग्रेस सोडली नाही. परंतु, संघटना अडचणीत असताना काकांना कौटुंबिकरित्या अडचणीत आणण्याचे काम केले, असे सांगताना उदयसिंह पाटील म्हणाले, काकांनी खचून न जाता संघटनेच्या माध्यमातून पुन्हा जिल्ह्यात काम केले. विकासकामे करून गावे जिल्ह्याच्या नकाशावर आणली. तीच विकासगंगा प्रवाहीत ठेवण्यासाठी, संघटनेची आजची परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
“रयत” सभासदांच्या मालकीचाच राहणार : काकांच्या पश्चात पराभवाने खचून न जाता आपण संघटना बांधत गेलो, असे सांगताना उदयसिंह पाटील म्हणाले, कारखाना अडचणीत असताना काकांनी भागीदारीवर चालवला. आज तो कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे आणि उद्याही तो त्यांच्याच मालकीचा राहील, असेही त्यांनी यावेळी संगितले.












