कराड/प्रतिनिधी : –
विद्यार्थी दशेपासूनच प्रत्येकाने किमान पाच पानं दररोज वाचली आणि लिहिली पाहिजेत. तरच आपली वाचन संस्कृती वाढेल. आजची पिढी मोबाईलला जसा वेळ देते, तसा पुस्तक वाचनासाठी ही वेळ देणे गरजेचे आहे. आज वाचनालये ओस पडत असताना वाचन संकल्प संकल्पनेमुळे नवे वाचक निर्माण होतील, असे मत लेखक व पत्रकार अभयकुमार देशमुखयांनी व्यक्त केले.
लेखक वाचक संवाद : मलकापूर येथील समाजप्रबोधन सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत लेखक वाचक संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लेखक व पत्रकार अभयकुमार देशमुख होते.
मान्यवरांची उपस्थिती : प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विशाल पाटील आणि गझलकार प्रा. संध्या पाटील उपस्थित होत्या. यावेळी वाचनालयाच्या उपाध्यक्षा सुरेखा खंडागळे, ग्रंथपाल वैशाली शेवाळे, लिपिक शुभांगी चव्हाण, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती शिंदे, नीलम कांबळे यांच्यासह मळाईदेवी शिक्षण संस्थेतील शिक्षक, वाचनालयाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
वाचनाशिवाय पर्याय नाही : पत्रकार, लेखक, कवी किंवा कोणतेही प्रकारचे साहित्य लेखन असेल, तर आपले वाचन असणे गरजेचे आहे. ज्ञान वाढवण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आपल्याला वाचनाशिवाय पर्याय नाही, असे मत पत्रकार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.
गझलकार होण्यासाठी परिश्रम घ्यायची तयारी हवी : गझल हा प्रकार गद्य आणि पद्य यामधील आहे. गझलकार होण्यासाठी फार मोठे परिश्रम घ्यावे लागतात, असे सांगताना प्रा. संध्या पाटील म्हणाल्या, गझल मधील प्रत्येक ओळ ही वेगळा अर्थ सांगते. मलकापूर येथील समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय गेल्या 32 वर्षापासून वाचन चळवळ राबवत आहे, ही बाब गौरवास्पद आहे.