आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची ३५ कोटींच्या निधीची मागणी; ना. गोरे यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुका पंचायत समितीची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत साकारण्यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने त्यांनी गेल्या महिन्यात शासकीय अधिकाऱ्यांसमवेत श्री दैत्यनिवारणी देवी मंदिर परिसरातील प्रस्तावित जागेची पाहणी केली होती.
सकारात्मक प्रतिसाद : या नव्या प्रस्तावित इमारतीसाठी ३५ कोटींच्या निधीची मागणी करत, आ. डॉ. भोसले यांनी आज मुंबईत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे नव्या इमारतीचा कृती आराखडा सादर केला. या आराखड्याबद्दल ग्रामविकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
पाच ठिकाणी चालते कामकाज : कराड तालुका हा लोकसंख्येच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने मोठा तालुका आहे. कराडमधील सध्याची पंचायत समितीची इमारत स्वमालकीची नसून, फार जुन्या धाटणीची आहे. सध्या पंचायत समितीच्या विविध विभागांचे कामकाज ५ वेगवेगळ्या ठिकाणी चालते. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची, अभ्यागतांची, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होते.
सुसज्ज इमारतीची गरज : कराड तालुक्यात पंचायत समितीचे एकूण २४ गण आणि जिल्हा परिषदेचे १२ गट असून, पंचायत समितीअंतर्गत एकूण १९ विभागाचे कामकाज चालते. याशिवाय कराड तालुक्यात कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश होतो. हा व्यापक विस्तार लक्षात घेता, कराड पंचायत समितीसाठी कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सुसज्ज इमारतीची नितांत आवश्यकता आहे.
नव्या इमारतीचा संकल्प : या अनुषंगाने पंचायत समितीशी निगडित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी यावीत आणि त्या माध्यमातून नागरिकांना सुलभपणे सर्व शासकीय सेवाचा लाभ घेता यावा, यासाठी कराड पंचायत समितीची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी करण्याचा संकल्प कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला आहे.
९४ गुंठे जागा उपलब्ध : कराड येथील श्री दैत्यनिवारणी देवी मंदिराशेजारी जिल्हा परिषदेच्या मालकीची सुमारे ९४ गुंठे जागा उपलब्ध असून, याठिकाणी सुसज्ज इमारत साकारणे शक्य आहे. त्यादृष्टीने आ.डॉ. भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत या जागेची पाहणी करुन, याबाबतचा कृती आराखडा ताबडतोब तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज मुंबईत आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांची भेट घेत, कराड पंचायत समितीच्या नव्या प्रस्तावित इमारतीचा कृती आराखडा सादर केला.
35 कोटींच्या निधीची गरज : नव्या प्रस्तावित इमारतीच्या ठिकाणी सर्व विभागांची कार्यालये, मासिक मिटींगसाठी एक सभागृह, तसेच इतर कार्यक्रमासाठी एक सभागृह, पार्किंग व्यवस्था, विश्रामगृह आदी सोयीसुविधांसाठी सुमारे ३५ कोटींच्या निधी आवश्यकता असल्याची मागणी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ना. गोरे यांच्याकडे केली. या मागणीची गांभीर्याने दखल घेत, ना. गोरे यांनी ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, आर्किटेक्ट तुषार पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. घुले उपस्थित होते.
सर्व कार्यालये एकाच ठिकाणी
कराड पंचायत समितीच्या नव्या प्रस्तावित इमारतीमध्ये पंचायत समितीशी निगडित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणली जाणार आहेत. याठिकाणी मासिक मिटींगसाठी एक सभागृह, तसेच इतर कार्यक्रमासाठी एक सभागृह, पार्किंग व्यवस्था, विश्रामगृह यासह अन्य सोयीसुविधा साकारल्या जाणार आहेत.
कराड पंचायत समितीची नवी सुसज्ज इमारत उभारणीच्या प्रस्तावाला ना. जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने अंतिम प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच कराड पंचायत समितीची सुसज्ज व अत्याधुनिक इमारत उभी राहून, कराडच्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल. कराड पंचायत समितीच्या विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. शिवाय या इमारतीमुळे कराडच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.
– आ.डॉ. अतुलबाबा भोसले