आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी झोपडपट्टीवासीयांना घरे, एम.आय.डी.सी.सह गुंतवणुकीबाबतचे मांडले मुद्दे
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी बुधवारी आपल्या पहिल्याच भाषणात विधानभवन गाजवले. त्यांनी कराड दक्षिणमधील झोपडपट्टीवासीयांना हक्काची पक्की घरे, कराडच्या एम.आय.डी.सी.मधील गुंतवणूक व विस्तार, तसेच विकास प्रकल्पांना गती देण्याबाबतचे मुद्दे मांडत, सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. राज्यपालांच्या अभिभाषणावर ते बोलत होते.
हिवाळी अधिवेशन : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विधानसभेचे सदस्य या नात्याने आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आपल्या भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
यशवंत भूमी म्हणून मतदारसंघाची ओळख : स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा माझ्या मतदारसंघाला असल्याचे शंकांना आ. भोसले म्हणाले, यशवंत भूमी म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघाची संस्कृती जपण्याची जबाबदारी मतदार बांधवांनी माझ्यावर सोपवली आहे. मला एका गोष्टीचा खऱ्या अर्थाने आनंद आहे, की महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात सव्वा लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यात झाली आणि या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत 1 लाख 13 हजार कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूकही आपल्या राज्यात झालेली आहे.
50 वर्षांपासून लोकांना पक्की राहण्याची घरे नाहीत : केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षांमध्ये 3 कोटी पक्की घरे देण्याचे काम या देशात केले. येत्या 5 वर्षांत आणखी 3 कोटी घरे केंद्र सरकार देणार आहे आणि त्यामुळे राज्यामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर पक्की घरे करण्याचे काम चालू आहे. माझ्या मतदारसंघात कराड शहरातील पाटण कॉलनीत 50 वर्षांपासून जे लोक राहतात त्यांना पक्की राहण्याची घरे नाहीत आणि ज्या जमिनीवर त्यांची झोपडपट्टी आहे, त्या जमिनीची लॅण्डयूझ परमिशन बदलण्याच्या बाबतीतला प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यावर येत्या काळात योग्य कार्यवाही होईल. तसेच मतदारसंघातील पाटण कॉलनीसह, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसर, मलकापूर परिसर या भागातील झोपडपट्टवासीयांना पक्की राहण्याची घरे देण्याचे काम येणाऱ्या काळामध्ये होईल, असा विश्वास आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला.
1300 युवकांच्या हाताला काम : कराडच्या एम.आय.डी.सी.मध्ये जागा उपलब्ध झाली, तर जवळपास 1300 युवकांच्या हाताला काम मिळेल, अशा क्षमतेचा मोठा उद्योग प्रकल्प उभारण्यास ऑटोमेशन नेक्स्ट नावाची ट्रॅक्टरची कंपनी इच्छुक आहे. जागेची व अन्य क्षमता तपासल्यानंतर या प्रकल्पाच्या माध्यमातून एखादी मिनी एम.आय.डी.सी.देखील करता येईल का याचादेखील प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन, आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यावेळी सभागृहात बोलताना केले.