स्थानिक निवडणुकांमध्ये लोक बदल घडवतील 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण; कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण लढलो. निवडणुकीत हार जीत ही होतेच. परंतु, विचार सोडून पळून जाण्याचे काम खरा कार्यकर्ता करत नाही. पुढील काळ कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे. त्या निवडणुकांना सामोरे जाण्याचा गंभीर विचार करणे गरजेचे आहे. मी तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे. चार महिन्यात अनेक घडामोडी होतील. राज्य सरकारची कृत्ये उघडकीस आल्यानंतर कदाचित लोकं विचार बदलतील, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

संवाद मेळावा : पाचवडेश्वर, (ता. कराड) येथील आनंद मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अजितराव पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, मलकपूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निकालावर विश्वास बसत नाही : लोकसभेनंतर लगेचच चार महिन्यात निवडणुकांचे चित्र असे वेगळे दिसेल. यावर कोणाचाच विश्वास बसत नाही, असे सांगताना श्री. चव्हाण म्हणाले, आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारला. मात्र, राज्यातील वातावरण हे एकंदरीत प्रक्रियेबाबत संशयाचे आहे. सरसकट राज्याचाच निकाल इतका एकतर्फी लागणे सर्वसामान्य मतदारांच्या मनात संशय निर्माण करणारे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचे काम करणे अपेक्षित होते.

लोकशाही जिवंत आहे का? : काँग्रेसने देशात लोकशाही आणली. लोकशाही हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे, असे सांगताना श्री चव्हाण म्हणाले, विधानसभेतील निवडणुकीनंतर लोकशाही जिवंत आहे का? हा सामान्य माणसाच्या मनात प्रश्न आहे. निवडणुकीचा निकाल धक्कादायक होता. लोकसभा निवडणुकीनंतर इतकी परिस्थिती बदलेल, असे वाटत नाही. पारदर्शक, मुक्त वातावरणात निवडणुका होत नाहीत. ईव्हीएम प्रक्रियेबाबत प्रत्येक नागरिकाला शंका आहे. काँग्रेसने पुढील निवडणुका मतदान प्रक्रियेने झाली पाहिजे, याकरिता देशव्यापी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. जर्मनीने ईव्हीएम प्रक्रियेवर संविधानिक आक्षेप घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यशवंत विचार तात्पुरता लुप्त झालाय : सद्य परिस्थितीस आपल्याला सामोरे गेले पाहिजे. जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला विचार तात्पुरता लुप्त झाला आहे, असे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, कॉन्ट्रॅक्टर व एजंटांचे राज्य आले आहे. काँग्रेस नेहमी संघर्षातून पुढे आली. शासनाने याआधी पुकारलेल्या योजनांना अटी व शर्ती घातल्या आहेत. 1400 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये जाहीर केलेल्या योजना कशा पुढे नेणार आहेत? याची चिंता वाटते. तोडा, झोडा नीतीला आपण सामोरे गेले पाहिजे. महात्मा फुले, छत्रपती शाहू व आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुढे आणण्याची गरज आहे.

महात्मा गांधींनाही हिंदुत्व मान्य होते : छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आम्हाला मान्य असून, हेच हिंदुत्व टिकवण्याची गरज असल्याचे सांगत अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, महात्मा गांधींनाही हिंदुत्व मान्य होते. ते शेवटी ‘हे राम’ म्हणाले होते. या निवडणुकीचे सिंहावलोकन करून पुढे जाणे गरजेचे आहे. 

संघर्षाची भूमिका घ्या : लाडकी बहीण योजना, मोफत वीज, धार्मिक तेढ या बाजूंवर महायुतीने काम केल्याचे सांगत श्री. उंडाळकर म्हणाले, ईव्हीएमबाबत सर्वत्र शंकास्पद वातावरण आहे. या परिस्थितीत संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. कार्यकर्त्यांनी संघर्षाची भूमिका घेत  सामान्य माणसापर्यंत पोहचले पाहिजे. 

… तर संघटनेला उभारी : नेता आणि कार्यकर्ता बरोबर चालला, तर संघटनेला उभारी देवू शकतो, असे सांगताना श्री उंडाळकर म्हणाले, विलासराव पाटील – उंडाळकर व पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील मूलभूत सुविधा पूर्णत्वास नेल्या आहेत. कार्यकर्त्यांनी वैचारिक भूमिकेतून काम करत गाव पातळीवर आपली संघटना मजबूत करणे गरजेचे आहे.

कार्यकर्त्यांच्या भावना : प्रा. धनाजी काटकर, भानुदास माळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद गटानुसार कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले.

उपस्थिती : मेळाव्यास गीतांजली थोरात, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, पंचायतरमेश देशमुख, नामदेव पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रशांत चांदे, संभाजी चव्हाण, संजय तडाखे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

भाजप व आरएसएसचा खरा विचार पुढे आला 

देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यातून भाजप व आरएसएसचा खरा विचार पुढे आला आहे, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला. तसेच या विरोधात आंदोलन करण्याच्या सूचना होतील, असेही कार्यकर्त्यांना सांगितले. 

उपकाराची परतफेड करण्याची संधी मिळाली 

मला कराडच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. कराड दक्षिणच्या मातीच्या उपकाराची परतफेड करण्याची मला संधी मिळाली. या संधीतून तुमच्या सर्वांच्या एकत्रित बळावर कराडची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश आल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!