आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश
कराड/प्रतिनिधी : –
शहरातील पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागण्याबाबत आज एक आश्वासक पाऊल उचलले गेले आहे. पाटण कॉलनीतील आरक्षित जागेवरील ‘पार्किंग’ हा उल्लेख काढून, तिथे ‘बेघरांसाठी घरे’ असा बदल करण्याची मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान केली.
मागणीची दखल : या मागणीची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या लोकांना याच जागेवर घरे मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार : कराड शहरातील पाटण कॉलनीत गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ अनेक लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून, त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यास आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्राधान्य दिले आहे. यादृष्टीने त्यांनी गेल्या आठवड्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत या परिसराची पाहणी केली होती. तसेच झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला दिले होते.
नामाभिदान : पाटण कॉलनीत ज्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीवासीय राहत आहेत, त्या जागेची मालकी कराड नगरपरिषदेकडे आहे. या जागेचे ‘खुली जागा’ असे नामाभिदान बदलून, ‘पार्किंग’ करण्याचा फेरबदल महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने 4 एप्रिल 2012 साली केला.
कराडला झोपडपट्टीमुक्त करण्याचा दृष्टीकोन : वास्तविक, या जागेवर दीर्घकाळापासून झोपडपट्टीवासीय राहत आहेत. त्यामुळे कराड शहराला झोपडपट्टीमुक्त करण्याचा दृष्टीकोन विचारात घेऊन, या जागेचे ‘पार्किंग’ आरक्षण बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ असे आरक्षण करणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने संयुक्तिक आहे. त्यादृष्टीने याबाबतचा प्रस्ताव आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिलेल्या निर्देशानुसार, कराड नगरपालिकेने राज्याच्या नगरविकास विभागास सादर केला आहे. याबद्दल प्रशासकीय पातळीवर तात्काळ कार्यवाही व्हावी, अशा मागणीचे पत्र आ. डॉ. भोसले यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ना. फडणवीस यांना दिले.
प्रस्ताव तयार करा : आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या या मागणीची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, या लोकांना याच जागेवर घरे मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
एक – दोन नव्हे; तर तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ हा विषय प्रलंबित आहे. या प्रश्नाचा पाठपुरावा करीत असताना आज मोठे यश मिळाले आहे. कराड दक्षिणमधील पाटण कॉलनी, शनिवार पेठ येथील (आरक्षण क्र. 48) या जागेस “पार्किंग” असा नामोल्लेख होता, तो बदलून “बेघरांसाठी घरे” असा व्हावा, याकरिता केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे झोपडपट्टीवासियांच्या हक्काच्या घरासाठीचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.
– आ. डॉ. अतुलबाबा भोसले