कराड/प्रतिनिधी : –
कराड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) परिसराचे सुशोभीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
मागणीची दखल : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी कराडकर नागरिक व शिवप्रेमी करत होते. त्याची दखल घेऊन राजेंद्रसिंह यादव यांनी याबाबत दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दत्त चौक परिसराच्या सुशोभीकरणाची गरज पटवून दिली होती. त्यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्हा नियोजन समितीमधून या कामासाठी विधानसभा आचारसंहितेपूर्वी निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.
नव्याने उभारणी : दत्त चौक परिसरातील रस्त्यांच्या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे आयलँड व पुतळ्यासमोरील त्रिकोणी आयलँडची उंची कमी झाली होती. नव्याने होणाऱ्या सुशोभीकरणात या दोन्ही आयलँडची उंची वाढवण्यात येणार आहे.
4 कोटी 13 लाख रुपयांचा निधी : याबाबत अधिक माहिती देताना राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आयलँडचे मजबुतीकरण व सुशोभीकरणासाठी 1 कोटी 45 लाख, तर पुतळ्यासमोरील त्रिकोणी आयलँडच्या मजबुतीकरण व सुशोभीकरणासाठी 2 कोटी 68 लाख असा सुमारे 4 कोटी 13 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे तर नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा नव्याने बांधण्यासाठी सुमारे 73 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही सर्व कामे सध्या निविदा प्रक्रियेत आहेत. या कामासाठी एकूण 5 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
मजबुतीकरण व सुशोभीकरण : पुतळ्याच्या आयलँडची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्याचे आयलँड काढून या ठिकाणी दगडी आयलँड उभे करण्यात येणार असून त्यास बुरुजांचा लुक देण्यात येणार आहे. पुतळ्याच्या पाठीमागे मोठा जरीपटका असणार आहे. येथील विद्युत व्यवस्था आकर्षक करण्यात येणार आहे. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी लिफ्ट असणार आहे. सध्या असणारा पुतळा काढून यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये ठेवण्यात येणार असून तेथे या पुतळ्याचे पॉलिश व अन्य कामे करण्यात येणार आहेत. सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर हा पुतळा पुर्ववत नवीन चबुतऱ्यावर बसवण्यात येणार आहे. नवीन चबुतरा जमिनीत 14 फूट खोल खड्डा काढून मजबुतीने बांधण्यात येणार आहे.
किल्ल्याचे स्वरूप : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असणारा त्रिकोणी आयलँड पूर्णपणे काढून येथे नव्याने उंचीचे दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. त्यास किल्ल्याचे स्वरूप देण्यात येणार आहे. या पुतळ्यावर मावळे, हत्ती, आबदागिरी असे फायबरचे पुतळे असणार आहेत.
निविदा प्रक्रिया : सध्या या कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसात या सर्व कामांना सुरुवात होणार आहे. नुकतीच राजेंद्रसिंह यादव यांनी नगरपालिकेचे नगर अभियंता गायकवाड यांच्या समवेत पुतळा परिसराची पाहणी केली. पुतळा स्थलांतर व इतर कामांबाबत सूचना केल्या आहेत.
छत्रपती शिवरायांच्या शाही मिरवणुकीचा लूक
शिवतीर्थाचे सुशोभीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक अशा पद्धतीने या परिसराला लुक देण्याचा प्रयत्न आहे. मुख्य आयलँडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व त्यापुढील त्रिकोणी आयलँडमध्ये फायबरचे मावळे, हत्ती, आबदागिरी असा शाही मिरवणुकीचा लुक दत्त चौक परिसराला येणार आहे. त्या दृष्टीने हे सुशोभीकरण करण्यात येत असे आहे, अशी माहिती राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.