आमदार अतुल भोसले यांची घेतली भेट; विकासासाठी सर्वोच्च योगदान देण्याचा संकल्प – सुहास जगताप
कराड/प्रतिनिधी : –
कराड नगरपालिकेत आज शुक्रवारी उपनगराध्यक्ष, तसेच चार स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडी पार पडल्या. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुहास जगताप यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली. शहरातील अनुभवी व निष्ठावंत कार्यकर्ते सुहास जगताप यांना पक्षाने संधी दिली आहे. भाजपने कराड शहरात संघटन बळकटीकरणाला प्राधान्य देत तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
खंदे समर्थक : सुहास जगताप आमदार डॉ. अतुल भोसले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शहरात भाजपच्या विस्तारासाठी सातत्याने काम केले आहे. प्रभावी संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी आपल्या प्रभागासह संपूर्ण शहरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले.
कार्याची दखल : विधानसभा, तसेच नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली.
भेट, शुभेच्छा व सत्कार : या निवडीनंतर सुहास जगताप यांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांची भेट घेतली. यावेळी आमदार भोसले यांनी नूतन नगरसेवक सुहास जगताप यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सत्कार केला. यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा सुषमाताई लोखंडे उपस्थित होत्या.
पक्षनिष्ठेची दखल : नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुहास जगताप म्हणाले, भाजपच्या माध्यमातून आपण नेहमीच शहराच्या हितासाठी काम केले आहे. पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. आपल्या कामाची आणि पक्षनिष्ठेची दखल घेऊन पक्षाने नगरसेवकपदी संधी दिली असून, येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अधिक तत्परतेने काम करून हा विश्वास सार्थ करून दाखवू.
संकल्प : सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन कराड शहराच्या विकासासाठी सर्वोच्च योगदान देण्याचा आपला संकल्प असल्याचेही सुहास जगताप यांनी व्यक्त केला.