नवीन कृष्णा पुलावर लवकरच संरक्षक जाळी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार अतुल भोसले; आत्महत्यांना आळा घालण्यासाठी ४० लाखांचा प्रस्ताव

कराड/प्रतिनिधी : –

कराड-विजापूर राज्य मार्गावरील कराड शहरातील नवीन कृष्णा पुलावरून आत्महत्यांच्या घटना वाढत असल्याने पुलावर संरक्षक जाळी बसविण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून तीव्र होत आहे. या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बुधवारी (दि. १४) रात्री कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

अधिकाऱ्यांशी चर्चा : यावेळी आमदार डॉ. भोसले यांनी, या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुलावर संरक्षक जाळी बसविण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

तातडीने शासकीय मंजुरी : सार्वजनिक बांधकाम विभागाने कृष्णा पुलावरील संरक्षक जाळीसाठी सुमारे ४० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून, या खर्चाला तातडीने शासकीय मंजुरी मिळवून देण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार भोसले यांनी दिली. येत्या सात दिवसांत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकारात्मक भूमिकेबद्दल समाधान : या निर्णयामुळे कृष्णा पुलावर होणाऱ्या अपघाती, तसेच दुर्दैवी घटनांना आळा बसण्यास मोठी मदत होणार असून, प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!