शासकीय भरारी पथकाच्या अचानक तपासणीत स्पष्ट निष्कर्ष
कराड/प्रतिनिधी : –
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स कारखान्याच्या ऊस वजनकाट्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने अचानक तपासणी केली. विविध निकषांवर करण्यात आलेल्या सखोल चाचण्यांमध्ये जयवंत शुगर्सचा वजनकाटा पूर्णतः अचूक असल्याचे स्पष्ट झाले.
वजनकाट्यांच्या तपासणीचे आदेश : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस वजनात कोणतीही अनियमितता होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
संयुक्त पथकाची भेट : जयवंत शुगर्स कारखान्यावर शासकीय आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त पथकाने अचानक भेट देत तपासणी केली.
अचूकतेवर शिक्कामोर्तब : या तपासणीदरम्यान ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन घेण्यात आले. काही गाड्या गव्हाणीकडे गेल्यानंतर पुन्हा इलेक्ट्रॉनिक वे-ब्रीजवर बोलावून फेरवजन करण्यात आले. या दोन्ही वजन प्रक्रियेत कोणताही फरक आढळून आला नाही. तसेच वजनकाट्याबाहेरील डिजिटल डिस्प्लेवर भरलेल्या व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे दर्शविले जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तपासणीनंतर जयवंत शुगर्स कारखान्याचा ऊस वजनकाटा अचूक असून शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होत नसल्याचा स्पष्ट शेरा भरारी पथकाने नोंदविला.
अधिकारी, मान्यवरांचा सहभाग : या पथकात वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल, लेखा परीक्षक डी. ए. जाधव, उपलेखापरीक्षक एस. एस. जंगम, आकाश कांबळे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. यावेळी कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. टी. शिरसाट, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर अरुण खटके आदी उपस्थित होते.