वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे दमदार शक्तीप्रदर्शन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत तीनही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

कराड/प्रतिनिधी : –

वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाने भव्य रॅली काढत आपल्या राजकीय ताकदीचे प्रभावी दर्शन घडविले. या रॅलीत काँग्रेसच्या तीनही उमेदवारांनी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले. हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

मान्यवरांची उपस्थिती : या शक्ती प्रदर्शनाच्या वेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

 

उमेदवारी अर्ज सादर : वारुंजी जिल्हा परिषद गटासाठी सौ. सुनंदा नामदेव पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर वारुंजी पंचायत समिती गणासाठी रवींद्र बडेकर, तर कोयना वसाहत पंचायत समिती गणासाठी श्रीकांत पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले.

घोषणा, ढोल-ताशांचा गजर, उत्साह : रॅलीदरम्यान काँग्रेसच्या घोषणा, ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. विकास, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि लोकांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून वारुंजी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

संघटनात्मक ताकद : या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!