कराड नगरपालिकेतील भाजपच्या नगरपालिका गटनेतेपदी नगरसेवक विजय पांडुरंग वाटेगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ते नगरपालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणार आहेत. तर त्यांच्या अनुपस्थितीत नगरसेवक शिवाजी पांडुरंग पवार हे काम पाहतील. शिवाजी पवार यांची पक्षप्रतोद (व्हीप) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, व्हीप बजावण्याचे सर्व अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत.
नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक : आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सूचनेनुसार कराड नगरपालिकेत भाजपच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विजय वाटेगावकर यांची सभागृहातील भाजप गटनेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली.
अधिकृत पत्र : या निवडीबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले असून, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनाही त्याची माहिती देण्यात आली आहे.
तीन निवडणुकांत विजय : विजय वाटेगावकर हे सन 2006 पासून कराड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असून, त्यांनी सलग तीन निवडणुकांत विजय मिळवला आहे. आरोग्य समितीचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पालिकेच्या प्रशासनिक व विकासात्मक कामकाजाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून, भाजपमधील सर्वाधिक अनुभवी नगरसेवक म्हणून त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
फ्लोअर टेस्ट व नोंदणी : दरम्यान, भाजपचे गटनेते व दहा सदस्यांची फ्लोअर टेस्ट व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आगामी काळात नगरपालिकेत प्रभावी विरोधी भूमिका बजावली जाईल, असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.