सैदापूर २४x७ नळपाणी योजनेचा आदर्श मॉडेल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आसाम राज्य अधिकाऱ्यांची अभ्यासभेट; ग्रामपंचायतीच्या सौर प्रकल्पाची व आधुनिक व्यवस्थेची पाहणी

कराड/प्रतिनिधी : –

सैदापूर (ता, कराड) ग्रामपंचायतीच्या २४x७ नळपाणी पुरवठा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचा आदर्श देशातील इतर राज्यांसमोर ठेवला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी आसाम राज्यातील वरिष्ठ पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सैदापूर येथे अभ्यासभेट दिली.

२७ अधिकारी व पदाधिकारी सहभाग : या शिष्टमंडळात आसाम राज्य पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्राथा बरुहा, जलजीवन मिशनचे संचालक अर्णवकुमार बरुहा, तसेच कार्यकारी अभियंता अजोयकुमार लाहोन यांच्यासह राज्यातील विविध महानगरपालिका व नगरपरिषदांचे एकूण २७ अधिकारी व पदाधिकारी सहभागी झाले होते.

विशेष कौतुक : शिष्टमंडळाने सैदापूर ग्रामपंचायतीने स्वनिधीतून उभारलेल्या सोलर प्रकल्पाची पाहणी करून वीज बिलात केलेल्या बचतीबद्दल व स्वयंपूर्णतेच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प ग्रामपंचायतीचे सरपंच फत्तेसिंह धनाजी जाधव (भैय्या) यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला असून, या धडाडीच्या निर्णयाचे अधिकारीमंडळाने विशेष कौतुक केले.

ग्रामपंचायतीचे अभिनंदन : सैदापूर २४x७ नळपाणी योजनेअंतर्गत राबविण्यात आलेली आधुनिक मीटर कनेक्शन प्रणाली, रीडिंग, मासिक बिल वितरण व वसुली व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी पाहून आसामच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.

योजनेविषयी माहिती : या योजनेविषयी सविस्तर माहिती निवृत्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी उत्तम बागडे, सरपंच फत्तेसिंह धनाजी जाधव, पाणीपुरवठा अधिकारी गणेश यादव, एम.जे.पी. कॉन्ट्रॅक्टर प्रवीणकुमार जाधव व एमएसईबी कॉन्ट्रॅक्टर मयूर जाधव यांनी दिली.

आधुनिक सुविधांची पाहणी : यानंतर शिष्टमंडळाने ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीची व त्यामधील आधुनिक सुविधांची पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत श्री. जाधव व सर्व सदस्यांचे त्यांनी कौतुक केले.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी कराड पंचायत समितीचे उपाधिकारी जयदीप पाटील, श्री. माळी, सौ. मोहतो मॅडम, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, ग्रामविकास अधिकारी संजय निंबाळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.

ग्रामविकासाला नवी दिशा : या भेटीप्रसंगी आसाम राज्यातील अधिकारीमंडळाने सैदापूर ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमांचे कौतुक करत, अशा आधुनिक उपाययोजनांमुळे ग्रामविकासाला नवी दिशा मिळू शकते, असे मत व्यक्त केले व ग्रामपंचायतीस सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा दिल्या.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!