‘यशवंत विचार’ जोपासणे हेच काळाचे आव्हान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळासाहेब पाटील; योग्य वेळ आल्यावर सर्वांचा हिशोब चुकता करणार

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाने नेहमीच राज्याला दिशा दिली आहे. काहींची इतर पक्षांकडे पळापळ सुरू असली तरी, ‘यशवंत विचार’ जोपासणे हेच काळाचे आव्हान आहे. सर्व घडामोडींवर माझं लक्ष असून, योग्य वेळ आल्यावर सर्वांचा हिशोब चुकता केला जाईल, असा इशारा सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला.

कार्यकर्ता मेळावा : कोपर्डे हवेली, ता. कराड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला आमदार डॉ. विश्वजित कदम प्रमुख उपस्थित होते.

लोकशाहीत दडपशाही सुरू : पाटील म्हणाले, महाराष्ट्र घडविताना त्रिस्तरीय स्वराज्य संस्थांची संकल्पना ही लोकशाहीचा पाया मानली गेली. मात्र आज या संस्थांवर प्रशासक बसविल्याने सामान्य नागरिकांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठच उरलेले नाही. लोकशाहीत दडपशाही सुरू आहे; ती मोडून काढणे आवश्यक आहे. काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून धैर्याने निवडणुकीला सामोरे जायचे आहे. निवडणुकीत कोणा एकाला संधी मिळेलच, पण नाराजी नको. ही वेळ एकतेची आहे; वेगळा विचार करण्याची नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

लोकशाही बळकट करा : आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर लोकांच्या चेहऱ्यावर ‘असं झालं कसं?’ असा प्रश्न होता. पण सत्य कधीच लपून राहत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं आवश्यक आहे.

सत्तेची दिशा हुकूमशाहीकडे : मनोगत व्यक्त करताना अॅड. स्वाती पवार यांनी, राज्यातील लोकशाहीवरचा विश्वास कमी होत आहे. सत्तेची दिशा हुकूमशाहीकडे झुकते आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय, महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाला बळ द्यावे, असे आवाहन केले.

मान्यवरांची उपस्थिती : मेळाव्यात दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र पाटील, सुनील जगदाळे, शंकरराव खापे, मानसिंगराव जगदाळे, लालासाहेब चव्हाण, सुहास बोराटे, अजितराव पाटील-चिखलीकर, सागर पाटील, सिद्धार्थ चव्हाण, संगीता साळुंखे, शारदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेताजी चव्हाण यांनी, सूत्रसंचालन संभाजी चव्हाण यांनी, तर नितेश डुबल यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!