भरतनाट्यमद्वारे भारतीय संस्कृतीचा जागतिक मंचावर ठसा
कराड/प्रतिनिधी : –
भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचा जागतिक स्तरावर गौरव करणारा कराडचा अभिमान इशिता राहुल फासे हिने व्हिएतनाम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भरतनाट्यम या पारंपरिक नृत्यप्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कराड शहराचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळला आहे.
200 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग : ही स्पर्धा 6 नोव्हेंबर रोजी व्हिएतनाममधील हॅनोई शहरात पार पडली. सौदी अरेबिया, अमेरिका, ओमान, मसकत, दुबई आणि मॅरिशिअससह विविध देशांतील तब्बल 200 हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.
श्रीकृष्णकथेवर आधारित भरतनाट्यम : इशिता सध्या पोद्दार स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत असून, तिने 14 वर्षांवरील वयोगटात ‘कालिया मर्दन’ या श्रीकृष्णकथेवर आधारित भरतनाट्यम सादर केले. तिच्या भाव, ताल आणि अभिव्यक्तीने परीक्षकांची मने जिंकली.
मार्गदर्शन व प्रोत्साहन : इशिता हिने यापूर्वी मुंबई येथे झालेल्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष जूनिअर्स’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिला स्वरनिर्झर डान्स अकॅडमीच्या रसज्ञा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले असून, पोद्दार स्कूलकडूनही सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे.
पाठबळामुळे यश : वडील डॉ. राहुल फासे आणि आई डॉ. अस्मिता फासे यांच्या सततच्या पाठबळामुळे हे यश शक्य झाले, असे इशिताने सांगितले.
अभिनंदनाचा वर्षाव : भरतनाट्यम हे भारतातील प्राचीन शास्त्रीय नृत्यप्रकार असून, त्यात भक्ती, भाव, नाद आणि ताल यांचे सुंदर मिश्रण आढळते. या नृत्यप्रकाराद्वारे भारतीय संस्कृती, देवत्व आणि परंपरेचे दर्शन घडते. इशिताच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशामुळे कराडच्या सांस्कृतिक परंपरेला नवे तेज लाभले असून, शहरभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.