????श्रीशिवछत्रपतींची प्रेरणा व पदभ्रमंतीचा थरार!????

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भाग चौथा : 

आजच्या लेखमालेचा प्रारंभ करण्यापूर्वी लेखाच्या शीर्षकात थोडा बदल करणार आहे. आता लेखाचे शीर्षक “श्रीशिवछत्रपतींची प्रेरणा व व्याघ्रगडाची दिव्यानुभूती!” असे करणार आहे.

लिहीणं गरजेचं असतं. जे ऐकायला तयार नाहीत, त्यांनी वाचाव म्हणून!

काही गोष्टींचा खुलासा आधीच केलेला बरे असते. नाही तर पुढे जाऊन अधिक गोंधळाची स्थिती उद्भवू शकते. नेमकी हीच बाब आम्ही दुर्लक्षित केली होती आणि आता त्याचे परिणाम भोगण्याची वेळ आमच्यावर आली होती. अर्थात अशा प्रसंगातून यापूर्वी देखील आम्ही तावूनसुलाखून निघालो होतो. म्हणजे मयूर गणेश मंडळाचा प्रारंभीचा काळ असेल किंवा महापुरात स्वतःला झोकून देण्याचा अतिशहाणपणा असो; केवळ “दैव बलवत्तर” म्हणूनच हे दिवस पाहण्याचे भाग्य लाभले आहे.

एक मात्र खरे की यापूर्वी ज्या प्रसंगातून आम्ही सुखरूप निभावलो होतो त्यापेक्षा आता येणारी परिस्थिती “ना भूतो ना भविष्यती” अशीच असणार होती.

बामणोली ते वासोट्याचा पायथा (जलाशयाचा काठ) इथपर्यंत तरी सर्व काही व्यवस्थित पार पडले होते. पण ज्यावेळी त्या नावाड्याने दूरवर पसरलेल्या आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या पर्वत शिखराकडे दिशा निर्देश केला त्याच वेळी आमच्या ‘आत्मविश्वासाला पहिला सुरुंग’ लागला होता. फक्त स्वतःच्या मनातील भावना कुणी व्यक्त करत नव्हते. पण आमच्या चेहऱ्यावर पसरलेली शांतता व भययुक्त रेषा सर्व काही सांगून जात होती.

काठापासून काही अंतरावर गर्द झाडी दाटलेली दिसत होती. जंगलात पायवाट वगैरे ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्यातील तर ‘ओ’ की ठो’ आम्हाला माहिती नव्हता. त्यातही सूर्यास्त होत आला होता. काठापासून थोडे अंतर चालून आम्ही थांबलो. इथून पुढे चालायला सुरुवात करण्याआधी आपण काही तरी खाऊन घेऊयात असे ठरवले. विजय, नितीन व मी घरातून डबे आणले होते. म्हणजे पोळी व भाजी इतकेच! आंदया तर नुसता कपड्यानिशी आला होता आणि मन्याला घरातून नुसतेच मोकळ्या हाताने बाहेर पडावे लागले होते. ‘त्याचा डबा मोकळा होता तरी खिसा भरलेला होता’.

परंतु, “एक तीळ सात जणात वाटून खाण्याचे” बाळकडू आम्हाला पाजले होते.

“अप्पलपोटी होण्यापेक्षा अर्धपोटी राहू” पण सोबत असलेल्या साथीदाराला आधी दोन घास भरवू, अशी आमची घडण घडली होती.
त्यामुळे आमच्या तिघांच्या डब्यावर पाच जणांचे उदरभरण होणार होते. आम्ही डबे उघडले आणि जी काही पोळी भाजी होती ती वाटून घेतली.

वासोटा किल्ल्याच्या त्या घनदाट जंगलात वन्य श्वापदांचा अगदी मुक्त संचार असतो. आता तर तो सगळा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. पण आम्ही मात्र अशा कुठल्याही धोक्याची कल्पना केली नव्हती.
इथे एक गमतीदार गोष्ट सांगायलाच हवी. या जंगलात वाघही असतील अशी उगीचच बतावणी आम्ही केली. त्यावर मन्याने बॅगेतील भाजी चिरायची सुरी बाहेर काढली आणि अगदी उभे राहून ऍक्शन करून,

“बघा वाघ आला तर असे खाली वाकायचे त्याचे पुढचे दोन्ही पाय धरायचे आणि ही सूरी अशी त्याच्या पोटात खुपसायची”

असे हावभावसहित करून दाखवले. म्हणजे भाजी चिरायच्या सुरीने हा पठ्ठा वाघाला मारायला निघाला होता. त्याची ती कृती पाहून अगदी हसून हसून आमची मुरकुंडी वळली होती. पुढे हा किस्सा अनेकदा व अजूनही विनोद होतो आणि आम्ही सगळे खदखदून हसून त्याला दादही देतो. वाघोबा राहूदे एखादे रानडुक्कर जरी आले असते तरी जी काही पळताभुई झाली असती त्याची कल्पनाही करता येणार नाही!

असो! आम्ही घास घेतच होतो आणि तितक्यात एक काळ्या रंगाचे श्वान आमच्या पाठिशी येऊन दाखल झाले. ज्यांनी कुणी वासोट्याला भेट दिली असेल त्यांचा तरी त्या चहुकडे पसरलेल्या जंगलात एखादे श्वान असेल यावर विश्वास बसणार नाही. आम्ही तर त्या सर्व परिसराविषयी ‘अज्ञ’ होतो. कदाचित त्यामुळेच त्या श्वानाच्या येण्याचे आम्हाला वैषम्य वाटले नाही. कदाचित जवळपास कुठेतरी एखादे गाव किंवा वस्ती असेल व तिथूनच तो आला असेल अशी आम्ही आमच्या मनाची समजूत काढली होती. मग आमच्या घासातील आणखी एक वाटेकरू समजून आम्ही त्यालाही खाऊ घातले.

उदरभरण झाले आणि आम्ही साहित्य घेऊन वासोट्याच्या दिशेकडे पाहून उभे ठाकलो. आता पुढे तर जायचे होते पण कसे व कुठून याचा थांगपत्ता नव्हता. आणि इथेच एका दिव्यानुभूतीचा आरंभ झाला होता.

नेमकी काय होती ती दिव्यानुभूती याचा उलगडा पुढील भागात करूया!

क्रमशः 
समीर श्री. आराणके (ज्येष्ठ पत्रकार) 
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८ 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!