प्रा. विठ्ठल पाटील (राज्यशास्त्र) पाचुंब्री, ता. वाळवा, जिल्हा सांगली यांचे गुरुवार, दि. २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. पाटील सरांच्या निधनाची बातमी सायंकाळी सहा वाजता समजली, खुप दुःख झाले. त्यांच्या झंझावती कार्याच्या स्मृती पुढे उभ्या राहिल्या.
१९८७-८८ पासून शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या विठ्ठल पाटील सरांच्याबरोबर १९९० ते १९९३ चार वर्षे अध्यापनाचे काम करण्याचा योग आला. त्यांच्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. कामावर निष्ठा, स्पष्टवक्तेपणा व बाणेदारपणा, हे सरांचे खास गुण माझ्यासारख्या नवीन शिक्षकांना प्रेरणादायी ठरले. पाटील सर आजारी आहेत, कंटाळलेले आहेत, असे कधीच दिसले नाहीत. कॉलेज विनाअनुदानित असताना, अत्यंत अल्पशा पगार म्हणण्यापेक्षा थोड्या मानधनावर, पण कोणतीही तक्रार न करता सुट्टी दिवशीही ज्यादा तास घेणारे विठ्ठल पाटील आमच्यापुढे आदर्श राहिले. सरांचे विशेष म्हणजे पहिल्या सत्रात सर्व अभ्यासक्रम शिकवून पुर्ण करणे, दुसऱ्या सत्रात फक्त सराव परीक्षा, त्यामुळे निकालाचा उच्चांक कायमच राहिला. परिणामी विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून विठ्ठल पाटील कायम राहिले. आजही कराडमधील अनेक लोक, विद्यार्थी विठ्ठल पाटील सरांची आठवण काढतात.
१९९३ ला सरांची विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे बदली झाली. विवेकानंद कॉलेजमध्ये २४ वर्षे ते कार्यरत होते. २०१७ ला आर्ट्स कॉमर्स कॉलेज कडेपूर, ता. कडेगाव, जिल्हा सांगली येथे बदली झाली. कडेपूर येथे २०२१ मध्ये करोना काळात ते सेवानिवृत्त झाले. करोनामुळे शासनाचा प्रतिबंध असल्याने त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम झाला नाही. नंतर ते कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. एक निष्ठावंत मित्र, विवेकानंद कुटुंबातील एक कार्यक्षम व सर्वांचे जवळचे, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असे पाटील सरांचे व्यक्तीमत्व.
प्रा. विठ्ठल पाटील, प्राचार्य डॉ. होनगेकर, प्रा. किरण पाटील, प्रा. विलास पाटील, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, प्रा.डॉ. रुईकर, प्रा.सौ. निर्मला घोरपडे, प्रा.सौ सुचिता पाटील, प्रा.ऐ.जी. थोरात, प्रा.जे.के. पवार, प्रा. कनसे सर, प्राचार्य बी.एम. पाटील, प्रा.बी.एस. खोत, प्रा. महालिंग मुंडेकर, प्रा.पी.डी. पाटील, ग्रंथपाल राजाराम माळी, दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील अशी आमची बापूजी साळुंखे कॉलेजची १९९० ते १९९४ या काळात, एक मोठी संस्थानिष्ठ टीम, कराडमध्ये कॉलेजच्या विकासासाठी अखंडपणे कार्यरत होती. त्यामुळेच विठ्ठल पाटील सरांची स्पर्धा परीक्षेची चळवळ चालू ठेवण्यासाठी आम्ही कार्याध्यक्ष व संस्था कुटुंबप्रमुख प्राचार्य अभयकुमार साळुंखे व प्राचार्य जी.एल. ऐनापुरे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली १५ आॅगस्ट १९९९ पासून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. या केंद्रातील आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शासनाच्या प्रशासनात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठल पाटील सरांच्या संस्कारांमुळेच हे काम आजही सुरू राहीले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.
१९९० च्या काळात कराडमध्ये UPSC/MPSC स्पर्धा परीक्षेची पहिल्यांदा चळवळ निर्माण करण्याचे श्रेय विठ्ठल पाटलांच्याकडे जाते. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे पहाटे पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग भरवून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घ्यायचे व ८ ते १२ कॉलेजचे नियमित अध्यापन करावयाचे. विशेष म्हणजे त्यावेळी स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाचे सर्व विषय एकटे पाटील सर शिकवायचे. बदली झाल्यानंतर विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे त्यांनी हा उपक्रम २०१७ पर्यंत पूढे सतत चालू ठेवला. २८ वर्षे नोकरी सांभाळून बहुजन समाजातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झाले पाहिजेत, हे सामाजिक वृत्त घेऊन स्पर्धा परीक्षेची चळवळ अखंडपणे चालवणारे प्राध्यापक म्हणून विठ्ठल पाटील सरांचे नाव श्री विवेकानंद शिक्षण संस्थेच्या इतिहासात लिहिले जाईल.
पाटील सरांच्या स्पर्धा परीक्षा चळवळीचा परिणाम १९९३ पासून हजारो विद्यार्थी आज महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वाळवा या क्रांतीकारक तालुक्यातील पाचुंब्री या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील, विवेकानंद संस्थेवर प्रखर निष्ठा असलेले, कार्याध्यक्ष साहेबांचे, तसेच संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे आवडते प्राध्यापक, अनेक प्राचार्यांचे आवडते प्राध्यापक, विद्यार्थीप्रिय, मोठा मित्रपरिवार असलेले, सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे, थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ विठ्ठल पाटलांना मानसपुत्र मानत होत्या. असे आमचे मित्र, मार्गदर्शक प्रा. विठ्ठल पाटील आज देवाला प्रीय झाले, त्यांच्या स्मृती कायम राहतील. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो व सरांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली…
– प्रा. भगवान खोत
(शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कराड)
