????श्रीशिवछत्रपतींची प्रेरणा व पदभ्रमंतीचा थरार!????

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भाग तिसरा : 

कराडवरून वासोट्याला जाण्यासाठी आधी सातारा व तिथून बामणोली असा बसचा प्रवास करावा लागणार होता. तिथून पुढे लॉंच किंवा बोटीने वासोट्याच्या पायथ्यापर्यंत जावे लागते हे त्या कात्रणातून समजले होते. त्यामुळे आधी सातारा गाठायचे होते. काही वेळातच तशी बस मिळाली आणि सुमारे दीड दोन तासाने आम्ही सातारा बस स्थानकात उतरलो. त्यावेळी कराड सातारा मार्ग दुहेरी असल्याने थोडा अधिक वेळ लागत असे.

तिथे उतरताच आम्ही बामणोली बस किती वाजता आहे, याची चौकशी केली. त्या काळात बामणोली सारख्या दुर्गम भागात जाण्यासाठी खूपच कमी बसची सुविधा होती. परंतु बसची वाट पाहण्याखेरीज उपायही नव्हता.

दुपारी एक/दीडच्या सुमारास बामणोली बस एकदाची स्थानकात दाखल झाली. घाईगडबडीने गर्दीतून चढाओढ करत आम्ही बसच्या सिटवर दाखल झालो. दुपारी ३ च्या नंतर कासच्या मार्गाने, डोंगरदऱ्या, चढउतार पार करत बस एकदाची बामणोली येथे पोहचली. समोरच कोयना जलाशयाचा (शिवसागर जलाशय) विस्तीर्ण परिसर नजरेत भरत होता. हिरवीगार वनश्री डोळ्यांना सुखावत होती. आता पुढील प्रवासासाठी लॉंचने (बोटीने) जावे लागणार होते. त्यामुळे आम्ही लॉंच बाबत चौकशी सुरू केली. चार वाजत आले होते त्यामुळे कुणी वासोट्याला जाण्यासाठी तयार होईना.

पण हिंमत हारून उपयोग नव्हता आणि अखेर (अगदी हातापाया पडून) एक जण येण्यासाठी तयार झाला. त्यावेळी फार तर २५० ते ३०० रुपये लॉंचसाठी खर्च येत असे. शिवाय हा खर्च अरत-परत प्रवास, असा आकारला जात होता.
त्यावेळी खिशाला काय परवडेल याची चाचपणी आधी करायला लागे. जी व्यक्ती येण्यास तयार झाली त्याने ‘चला’ म्हणताच आम्ही त्याच्या पावलावर पाऊल टाकले. ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची पातळी खालावली होती. त्यामुळे बऱ्याच खाली उतरेपर्यंत आम्ही चालत होतो.

शेवटी एकदाचे त्या बोटीत आम्ही पाच जण दाखल झालो. इंजिनची घरघर सुरू झाली. थोड्याच अवधीत बामणोली ते वासोटा हा लॉंच मधील प्रवास सुरु झाला. सभोवताली पसरलेल्या अथांग जलाशयातून लॉंच पुढे सरकत होती. गर्द झाडीतून मधूनच डोकावून पाहणारे डोंगर, मधूनच दिसणारे पक्षांचे थवे, ते सगळेच निसर्ग सौंदर्य न्याहाळत आम्ही सुखावत होतो. आमच्या सर्वांसाठी हा पहिलाच लॉंचने होणारा प्रवास होता. त्यामुळे उत्कंठा अगदी काठोकाठ भरली होती.

महत्वाचे म्हणजे आपल्याला नेमके कुठे जायचे आहे ते माहिती होते पण तिथपर्यंत कसे पोहचायचे (म्हणजे प्रत्यक्ष वासोटा किल्ल्यावर) याची काडीमात्र कल्पना नव्हती. अति उत्साहाच्या भरात आम्ही भलतेच धाडस करायला निघालो होतो. पुढच्या काही वेळानंतर आपण नेमक्या कोणत्या संकटात सापडणार आहोत याची तसूभरही कल्पना नव्हती. आम्ही आमच्याच कल्पना विश्वात रममाण झालो होतो. आमच्या डोळ्यापुढे फक्त वासोटा किल्ला फेर धरून राहिला होता. जणू बाकी सगळ्या जगाचा विसर पडला होता.

आपले ध्येय किंवा उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही उतावीळ झालो होतो. लॉंच तिच्या गतीने चालू होती. नेमका किती वेळ लागतो किंवा लागेल याचीही आम्हाला तमा नव्हती. नेमके त्याच वेळी लॉंचने एक छोटेसे वळण घेतले आणि आपली दिशा बदलली. इतका वेळ दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे निघालेली लॉंच आता पश्चिमेकडून पूर्वोत्तर जायला लागली.
आता तिचा वेगही मंदावला आणि अगदी संथपणे ती पुढे जात होती. काही क्षणातच जलाशयाचा काठ आमच्या दृष्टोत्पत्तीस येऊ लागला. नावाडी अगदी सावधपणे लॉंच काठाकडे घेत होता. शेवटी ती लॉंच काठावर विसावली. आम्ही खाली उतरू लागलो. उतरत असतानाच आम्ही त्या नावाड्याला *”वासोटा किल्ला कुठे आहे?”* असा प्रश्न केला. त्यावर अगदी मिश्कीलपणे हसत त्याने दूरवर दिसणाऱ्या एका डोंगर कड्याकडे बोट दाखवले आणि

“उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत परत इथेच या” असे म्हणून पुन्हा बामणोलीच्या दिशेने लॉंच वळवली. तो आला तसा मागे वळला होता. काही वेळ लॉंच व तिची घरघर ऐकू येत होती. नंतर ती बंद झाली आणि लॉंचही दिसेनाशी झाली.

आता त्या काठावर फक्त आम्ही पाच जण उभे होतो…….आजूबाजूला फक्त घनदाट जंगल पसरले होते……. पुढे काय होणार?……..

क्रमशः 
समीर श्री. आराणके (ज्येष्ठ पत्रकार)
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८ 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!