????श्रीशिवछत्रपतींची प्रेरणा आणि पदभ्रमंतीचा थरार!????

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भाग दुसरा : 

ज्या काळात आम्ही वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी उभे ठाकलो होतो त्या काळात ते मोठ्या धाडसाचेच पाऊल होते. नुसते धाडसाचेच नव्हे तर जीवावर बेतणारे सुद्धा होते. मी असे का म्हणतो आहे त्याचा उलगडा पुढील भागात अगदी सविस्तरपणे होणारच आहे. अर्थात त्याची यत्किंचितही कल्पना आमच्या मनाला शिवली देखील नव्हती. एक तर पदभ्रमण, ट्रेकिंग या विषयी आम्ही पूर्ण अनभिज्ञ किंवा अज्ञानीच होतो.

एखाद्या दुर्गम गडावर, किल्ल्यावर जाण्यासाठी कोणती काळजी किंवा खबरदारी घेतली पाहिजे याची काडीमात्र माहिती नव्हती. शिवाय त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याचा पूर्ण अभाव होता. केवळ भावनेच्या भरात आणि श्री शिवछत्रपतींच्या चरित्रातून मिळालेली ‘प्रेरणा’ या आधारावर आम्ही ‘व्याघ्रगड’ पादाक्रांत करणार होतो. दैनिक सकाळचे कात्रण आम्ही अगदी जपून ठेवले आणि या मोहिमेत कोणकोणते सैनिक सहभागी होतील याची चाचपणी सुरू झाली. ही सगळी मोहीम अगदी ‘गुप्त’ असल्याने मी व विजयसिंह पाटील असे दोघेच सुरुवातीपासून खलबते करत होतो.
कारण इतर सगळी मित्रमंडळी वयाने आमच्यापेक्षा अगदीच लहान होती. त्यामुळे त्यातील कुणाची निवड होण्याची शक्यता धुसरच होती. शिवाय घरातील कुणाला याचा ‘सुगावा’ लागला तर आपला बेत फसणारच याची मनोमन खात्री होती.

मात्र आमच्या दोघांच्या मनाचा ठाम निश्चय झाला होता. त्याच दरम्यान नितीन मोरे (मंगळवार पेठेत वाडीवर राहण्यास होता) याच्याकडे आम्ही तू आमच्या बरोबर येणार का? अशी विचारणा केली.

कुठे जायचे आहे? या त्याच्या प्रश्नावर ‘वासोटा’ इतकेच उत्तर दिले गेले. या नावाने कोणते तरी गाव असेल असे वाटल्याने त्याने अधीक चौकशी न करता ‘हो’ म्हणून सहमती दर्शविली. चला दोनचे तीन झालो होतो. पण या बाबतीत पूर्ण गुप्तता बाळगायची अशी जणू ‘तंबीच’ आम्ही त्याला दिली होती.

आता अजून कोण येईल याची चाचपणी सुरू झाली आणि एक मासा गळाला लागला. त्याचे नाव होते मनोज फाटक! तो ही मंगळवार पेठेत रहायला (कन्या शाळेसमोर जुना बस स्टॉप होता) व त्याच्या वडिलांचे झेरॉक्सचे दुकान होते. त्याला पण तशीच विचारणा केली आणि तो सोबत येण्यास तयार झाला. आता आम्ही चार जण ही मोहीम यशस्वी करणार, या उत्साहात मश्गुल झालो.

कधी निघायचे व घरात काय सांगायचे ? असे काही प्रश्न भेडसावत होते. पण इथे पुन्हा गनिमीकावा मदतीला धावून आला. आम्ही घरी (म्हणजे आईवडील) कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणार आहोत, अशी खोटीच बतावणी केली. त्यामुळे अगदी स्वाभाविकपणे चौघांच्याही घरच्यांनी होकार दिला.

इथे एक गंमत म्हणजे मन्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत घरात कल्पनाच दिली नव्हती. जेव्हा प्रत्यक्ष निघण्याची वेळ आली तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली. मी आणि विजय पूर्ण तयारीतच होतो आणि तो दिवस उजाडला. तारीख होती ३१ मे १९९१!!

दै. सकाळच्या कात्रणातून एक गोष्ट समजली होती आणि ती म्हणजे वासोट्याला जाताना रॉकेल, काडेपेटी, खाण्याचे पदार्थ आणि एखादी सुरी सोबत ठेवायला हवी. त्यावेळी आमच्या जवळ सॅक नव्हतीच! त्यामुळे मी एक छोटी सुटकेस, विजयने खांद्यावर अडकवता येईल अशी प्रवासी बॅग घेऊन तयारी केली. म्हणजे बाह्य रुपावरून आम्ही कोल्हापूरला जात आहोत अशी घरच्यांना खात्री पटावी आणि ती तशी पटली देखील!

आम्ही दोघे सकाळी 8 च्या सुमारास घराचा उंबरठा ओलांडला. बाहेर पडतो न पडतो तोच समोर आनंद व अमर (पिट्या) हे रेमणे बंधू आमच्या समोर उभे राहिले. ते नुकतेच संगमावर पोहायला जाऊन परतले होते. आंदयाने आमच्या हातातील बॅग पाहून “कुठे निघालात” अशी विचारणा केली.

तो पण आमच्यातलाच एक असल्याने आम्ही अगदी दबक्या आवाजात वासोटा असे सांगितले. त्याने काही समजले नाही असे भाव आणत कधी परत येणार? असे विचारले. उद्या परत येणार असे म्हणताच, “मी पण येतो चला” असे म्हणून त्याने पिट्याला “तू वर घरी जा, मी जरा जाऊन येतो” असे सांगितले. तो पण थोरल्या भावाची आज्ञा प्रमाण मानून घराकडे वळला.
आनंदने ‘राज अपार्टमेंट’च्या खालूनच “जाऊन येतो” अशी आईबाबांना आरोळी दिली व आमची पावले मंगळवार पेठेत वळली. नितीन तयारच होता. मनोजच्या दुकाना समोर उभे होऊन आम्ही “मन्या चल की” अशी हाक मारली. त्याचे वडील सामोरे आले. आमचा एकूणच अवतार पाहून त्यांनी विचारले, “कुठे निघालात ?”

“कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला” असे प्रश्नोत्तर झाले. आता मन्या बाहेर आला आणि वडील घरात परतले. मन्याने बॅग घेतो म्हणून खूण केली व आत जाऊन बॅग घेऊन बाहेर पडण्याआधी वडिलांची नजर चुकवून गल्ल्यात हात घालून काही रक्कम खिश्यात कोंबली. त्याला वाटले कुणी पाहिले नाही पण आमच्या सूक्ष्म किंवा चाणाक्ष नजरेतून ती गोष्ट थोडीच लपणार होती? तिथून आम्ही बस स्थानक गाठले आणि सातारला जाण्यासाठी बसची वाट पाहू लागलो.

क्रमशः 
समीर श्री. आराणके (ज्येष्ठ पत्रकार)
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!