नॅशनल हेराल्ड केस प्रकरण; ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहिमेंतर्गत पृथ्वीराज चव्हाणांची बेळगावात पत्रकार परिषद
कराड/प्रतिनिधी : –
नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. २१ ते २७ एप्रिल दरम्यान ५७ शहरांमध्ये ५७ पत्रकार परिषदा घेण्यात येणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
विशेष मोहीम : ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. या काळात भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल, असे पक्षाचे म्हणणे आहे.
या नेत्यांचा समावेश : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून 57 नेत्यांची यादीच प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, मणिकम टागोर, गौरव गोगोई, सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कन्हैया कुमार, रणदीप सिंग सुरजेवाला, राजीव शुक्ला, अलका लांबा अशा अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
२३ एप्रिलला पत्रकार परिषद : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बेळगांव येथे २३ एप्रिल रोजी सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटी, बेळगाव येथे पत्रकार परिषद होणार आहे.
बैठकीत निर्णय : १९ एप्रिल रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि आघाडीच्या संघटनांच्या प्रमुखांच्या बैठकीत देशभरात पत्रकार परिषदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
