आमदार मनोज घोरपडे; सह्याद्रि कारखान्याला यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव देण्याची घोषणा
कराड/प्रतिनिधी : –
ज्या सह्याद्रि कारखान्याची निर्मिती स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली, त्यांचेच नाव कारखान्याला देण्यासाठी संचालकांच्या पहिल्या सभेतच ठराव घेणार असून आदरणीय यशवंतराव चव्हाण सह्याद्रि सहकारी साखर कारखाना असे कारखान्याला नाव देणार आहे. आजवर यांनी फक्त चव्हाण साहेबांचे नाव वापरुन राजकारण केले. परंतु, खऱ्या अर्थाने त्यांचे आचार-विचार रुजवण्याचे काम आम्ही करु, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.
सभासद संवाद बैठक : चरेगाव (ता. कराड) येथे स्व. यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनेलच्या जाहीर सभेत सभासदांच्या विविध प्रश्नांवर बोलताना त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर हल्ला चढवला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी मोहनराव माने, महेशबाबा जाधव, सुरेश पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, बाळासाहेब माने, सिध्दार्थ भोसले, विठ्ठलराव देशमुख, प्रदिप साळुंखे, कुलदीप पवार, बळवंत पवार, मदन काळभोर, प्रकाशराव पवार तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हणबरवाडी-धनगरवाडीच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी आणली : आमदार घोरपडे म्हणाले, कराड उत्तरच्या जनतेने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला आमदार म्हणून निवडून दिले. साडेतीन महिन्यात शेती पाण्याच्या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने काम केले आहे. खरतर यांच्या वडिलांच्या पासून चाललेली हनबरवाडी-धनगरवाडी योजना चाळीस वर्षांपूर्वी झाली नाही. मात्र, या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी आणली आहे.
१०० मीटर हेडची मंजुरी : तसेच पाल-इंदोली उपसा योजनेला १०० मीटर हेडची मंजूरी आणली आहे. विकासाचा बॅकलॉग अडीच वर्षातच भरुन काढणार असल्याची ग्वाही आमदार घोरपडे यांनी यावेळी दिली.
माफीनामा घेण्याचा विक्रम : कारखान्याचा खरा मालक सभासद आहे. पंरतु, मालकाकडून माफीनामा घेऊन यांनी विक्रम केला. माफीनामे घेवून कारखान्याला पाच-पन्नास कोटींचा फायदा झाला का? असा सवाल त्यांनी व्यक्त केला.
पाच-सहा हजारांनी निवडून येणार : तेव्हा ते मंत्री होते, मंत्री पदाची हवा डोक्यात होती, असे सांगताना आमदार घोरपडे म्हणाले, कारखानाचा मी व माझे कुटुंब मालक आहे, असे त्यांनी दाखवून दिले. पण, खरे मालक कोण हे दाखवण्यासाठीच ही निवडणूक लावली आहे. जसा हिशेब विधानसभेला झाला, तसाच हिशेब या निवडणुकीत होणार आहे. विधानसभेत 40-50 हजार मतांनी निवडून येणार, असे सांगितले होते. कारखान्याच्या निवडणुकीत पाच-सहा हजार मतांनी विजयी होणारच, असा विश्वासही आमदार घोरपडे यांनी व्यक्त केला.
सभासदांवर अन्याय झाला : मोहनराव माने म्हणाले, सह्याद्रि साखर कारखान्याच्या माध्यमातून व पाणी संस्थेच्या माध्यमातून आजवर शेतकरी सभासदांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांना कधीही ऊस बियाने कमी दरात दिले गेले नाही. इरिगेशन संस्थांऐवजी तारळी व मांड या नद्यांच्या दोन्ही बाजूला कॅनॉल होऊन बिन पैशाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार होते. मात्र, ते कॅनॉल रद्ध करून इरिगेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये शेतकरी सभासद कर्जबाजारी झाला. पाणीपट्टीत तडजोड करून पार्टी फंडाला पैसे वापरल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच उंब्रजची इरिगेशन संस्था याच भानगडीने बंद पडली. तशीच वाटचाल चरेगावच्या इरिगेशनची असल्याचेही श्री. माने यांनी सांगितले.
