भाग पाचवा :
पश्चिम दिशेकडून आता अंधार दाटत होता. पुढील मार्ग पूर्णपणे अज्ञात होता. तरीही थोडीशी मळलेली पायवाट दिसत होती. आम्ही पावले उचलली. अगदी गर्द दिसणाऱ्या झाडी पर्यंत चालायला काहीच अडचण नव्हती. पण त्यापुढे मात्र आमची पुरती भंबेरी उडाली. त्या गर्द झाडीतून पुढे जाताना छातीत सुरू झालेली धडधड जाणवू लागली. आपण नेमक्या कोणत्या प्रकारचे साहस करायला घेतले आहे त्याची ती केवळ सुरुवात होती. एका पाठोपाठ एक अशी आमची वाटचाल अगदी संथपणे सुरू होती.
एक एक पाऊल उचलत असतानाच आम्ही एकमेकांशी संवाद साधत होतो. त्या मागे केवळ मनात *’भय’* निर्माण होणार नाही एवढाच उद्देश होता. पण एके जागी आमची पावले थबकली. पुढील पायवाट जणू कुठेतरी अदृश्य झाली होती. आता काय करायचे? आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो. पण तोच क्षण होता……त्या दिव्य अनुभूतीच्या प्रारंभाचा!
इतका वेळ आमच्या सर्वांच्या अगदी शेवटी चालणारा तो श्वान आमच्या सर्वांच्या अगदी पुढे येऊन उभा राहिला. त्याचे हे वर्तन आमच्या आकलनशक्तीच्या पलिकडचे होते. तो केवळ पुढे येऊन थांबला असे नाही तर त्याने त्या झाडीतून वाट काढत पुढे जाण्यास सुरुवात केली. त्याचे ते पुढे जाणे आम्हाला त्याच्या मागोमाग चालण्याचेच सूचित करत होते. आम्ही अगदी न कळत त्याचे अनुसरण करण्यास सुरुवात केली. तो श्वान आमच्या पुढे काही अंतर जायचा व आम्ही त्याच्या जवळ पोहचेपर्यंत तो त्याच जागी उभे रहायचा. जणू काही तो आमचा *’वाटाड्या’* असावा!
आता आम्ही अगदी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो होतो. तिथे एक हनुमंताची भव्यदिव्य मूर्ती उभी होती व अजूनही आहे. आम्ही त्या हनुमंताचे मनोभावे दर्शन घेतले.
*भीमरूपी महारुद्रा। वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनी सुता। रामदूता प्रभंजना।।*
आता ही मारुतीरायाची मूर्ती इथे कुणी, कधी व कशासाठी स्थापन केली असेल ते समजण्यास मार्ग नाही. आणि तसेही पाहू गेलात तर इतिहास हा नेहमीच मूक असतो. तो समजून घेण्यासाठी *कानाचेही कान करून श्रवण* तरी केले पाहिजे किंवा ऐतिहासिक पत्रांचे वाचन तरी करता यायला हवे. अन्यथा सगळाच इतिहास खोटा ठरवणाऱ्या महाभागांची संख्या दिवसागणिक वाढतच जाणार आहे.
आम्ही त्या हनुमंताची प्रार्थना केली आणि काही वेळ तिथे विसावा घेतला. पण आता हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरू लागले होते. इथून किल्ल्यावर जाण्यासाठी किती वेळ लागेल याची खात्री नव्हती. त्यामुळे फार वेळ न रेंगाळता आम्ही जागेवरून उठलो. त्याच क्षणी इतका वेळ आमच्या सोबत विसावा घेणारा तो श्वानही उभा राहिला. जणू काही आमच्या सोबत, नव्हे आमच्या आधी त्याला गड सर करायचा होता.
इतका वेळ सुरू असणारी कसरत आता एका वेगळ्याच वळणावर आली होती. तो श्वान पुढे व आम्ही मागे चालू लागलो. इथून थोडे अंतर गेलो असू आणि मग खऱ्या अर्थाने आमची सत्वपरिक्षा सुरू झाली. म्हणजे इथूनच गडाच्या चढणीला सुरुवात झाली होती. आमच्या पायात बुटही नव्हते. अगदी साधी चप्पल वगैरे म्हणतात तशी पादत्राणे होती. त्यामुळे घसरड्या चढणीला लागताच आमची दमछाक सुरू झाली.
हे कमी होते की काय म्हणून सगळीकडे अंधार दाटला होता. पुढे असणारा तो श्वान नेमका कोणत्या दिशेला जात आहे ते देखील दिसत नव्हते. आता यावर उपाय काय? बॅटरी तर नव्हतीच. पण एक आधार होता तो म्हणजे रॉकेल व काडेपेटी!
झाले तर मग……जवळच असलेल्या झाडाच्या फांद्या (थोड्या लांबसर) घेतल्या आणि त्या पुढची पायरी म्हणजे बॅगेतील बनियन, टॉवेल बाहेर काढले. एका फांदीच्या अग्रभागी पहिल्यांदा बनियन गुंडाळले. त्यावर थोडे रॉकेल शिंपडले आणि काडेपेटीने पुढची आपली कामगिरी बजावली. जणू काही शिवकाळातील वाचलेले प्रसंग आज आम्ही अनुभवत होतो.
आमच्यातील एक जण पुढे ती *’मशाल’* घेऊन त्या श्वानाचा मागोवा घेत पुढे सरकत होता. श्वान थांबला की मागे वळून इतरांना पुढे येण्यासाठी मशाल मागच्या बाजूला वळवून वाट दाखवली जात होती. हा सगळा *’चित्त थरार’* असाच पुढे सुरू राहणार होता….अगदी आम्ही गडावर पोहचेपर्यंत…..नाही…..नाही…..अगदी गडावरून उतरून पुन्हा लॉंचमध्ये आरूढ होईपर्यंत!!

क्रमशः
समीर श्री. आराणके (ज्येष्ठ पत्रकार),
सोमवार पेठ, कराड.
दूरभाष : ९४०३१६६५५८












