रामकृष्ण वेताळ; मसूर येथील सांगता सभेत घणाघात, माफिनामे घेणाऱ्यांना सभासद माफ करणार नाहीत – थोरात
कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तरमधील एकाच घरात गेली ५४ वर्षे सत्ता आहे आणि तीस वर्षे स्वतः सह्याद्रि’च्या चेअरमन पदावर आहेत. मात्र, त्यांना सभासदांच्या हिताचे काहीही घेणेदेणे नाही. याउलट विद्यमान चेअरमन आपल्या लाडक्या युवराजला कारखान्यावर कसे सेट करता येईल, यामध्ये ते मग्न आहेत. त्यामुळे आता त्यांनाच घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन रामकृष्ण वेताळ यांनी केले.
सांगता सभा : मसूर (ता. कराड) येथे झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या सांगता सभेत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी पॅनेल प्रमुख निवासराव थोरात, धैर्यशील कदम यांच्यासह भिमराव पाटील, सचिन नलवडे, संपतराव माने, विश्वास काळभोर, प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चेअरमानांना आणि आमदारांनाही अहंकार : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आपले पॅनेल आहे. कारखान्याच्या विद्यमान चेअरमानांना अहंकार झाला होता आणि आत्ताच्या विद्यामान आमदारांनाही मोठा अहंकार झाला आहे, असे सांगत श्री. वेताळ म्हणाले, अहंकार जास्त काळ टीकत नाही. येणारा काळ त्यांना माफ करणार नाही.
…म्हणून सह्याद्रि’ची निवडणूक तिरंगी : या निवडणुकीच्या माध्यमातून कारखान्याच्या विद्यमान चेअरमनांना घरी बसवण्याची विद्यमान आमदारांची आणि त्यांच्या बगलबच्यांची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी सह्याद्रि’ची निवडणूक तिरंगी केली, असा आरोप श्री. वेताळ यांनी यावेळी केला.
मताधिक्य द्या : आता या परिवर्तन घडवण्यासाठी सर्व स्वाभिमानी सभासदांनी मनामध्ये फक्त विमान चिन्ह लक्षात ठेवून आपल्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहनही श्री. वेताळ यांनी यावेळी केले.
खोटेपणा करुन सभासदांची फसवणूक : सह्याद्रि कारखान्याच्या उभारणीमध्ये ज्या सभासदांनी सोसायटीचे कर्ज काढून शेअर्स रक्कम भरली, त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, विद्यमान चेअरमन यांनी त्यांच्या वारसांच्या नोंदी केल्या नाहीत, असे सांगत निवासराव थोरात म्हणाले, सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. संचालक मंडळाला हाताशी धरुन विद्यमान चेअरमनांनी खोटेपणा करुन सभासदांची फसवणूक केली. तसेच त्यांच्या पोटावर लाथ मारण्याच काम केले. आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे विद्यमान चेअरमन यांनी मोफत साखर देण्याचे जाहीर केले.
सभासद माफ करणार नाहीत : गेल्या दहा वर्षांपूर्वी कारखान्याचे विस्तारिकरण होणे गरजेचे असताना, ते केले नाही, असे सांगत श्री. थोरात म्हणाले, शेतकऱ्यांकडून माफिनामे घेणाऱ्यांना सभासद माफ करणार नाहीत. सभासदांची दिवाळी अंधारमय करण्याचे काम चेअरमनांनी केले. सभासदांना ‘सह्याद्रि’ आपला वाटला पाहिजे, असा घडवण्याचे काम आपण करु, असेही त्यांनी सांगितले.
…तर कारखाना कर्जात गेला नसता : येथे जमलेले भाडोत्री लोक नाहीत, हे सर्व सह्याद्रि’चे सभासद आहेत, असे सांगत धैर्यशील कदम म्हणाले, गेल्या ५० वर्षांत कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला असता, तर आज कारखाना कर्जात गेला नसता. अनेक कारखान्यांनी डिस्लरी वाढवली, कारखान्यांची प्रगती केली. मग सह्याद्रि कारखान्याची प्रगती का झाली नाही? दरवर्षी साखर पावसात भिजते, असा कारभार केला; तर कशी कारखान्याची प्रगती होईल.
योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता हवी : सह्याद्रि कारखान्याच्या प्रगतीसाठी योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता जाणे गरजेचे आहे, असे सांगत श्री. कदम म्हणाले, ज्यांना आपण निवडून दिले, त्यांना पण आज वाटू लागले, सह्याद्रि पण आपल्या हातात आला पाहिजे. नेत्याने नेत्याप्रमाणे वागावे. मात्र, तुम्ही बालिश वागताय. विद्यमान आमदारांनी सर्वांना गंडवायच काम केले आहे. आपल्याला कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळवून द्यायचा आहे.
मनोगत व उपस्थिती : याप्रसंगी भिमराव पाटील, सचिन नलवडे, संपतराव माने, विश्वास काळभोर, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुदाम चव्हाण, भिमराव डांगे, शैलेश चव्हाण, अमित जाधव, दादासाहेब चव्हाण, अमित पाटील, शिवाजी चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी पॅनेलचे सर्व उमेदवार व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
