‘सह्याद्रि’ अभेद्य आहे – बाळासाहेब पाटील 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पाल येथे पी. डी. पाटील पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ; 750 कोटींच्या कर्जाचा आकडा विरोधकांनी कुठून काढला? 

कराड/प्रतिनिधी : –

सर्व सहकारी साखर कारखान्यांवर खासगी कारखानदारांचे संकट घोंगावत आहे. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांनी हे संकट परतावून लावावे. सह्याद्रि’कडे वाकड्या नजरेने बघानारांचा आतापर्यंत बंदोबस्त केला आहे. भविष्यातही त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांना दिला. तसेच सह्याद्रि अभेद्य आहे. सह्याद्रि हे नाव यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिले होते, हे विरोधकांनी ध्यानात घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

प्रचार शुभारंभ : पाल (ता. कराड) येथे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पी. डी. पाटील पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ श्री. खंडोबा मंदिरात झाला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : सभेस अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, सोनहिरा कारखान्याचे  व्हाईस चेअरमन दिपक भोसले, मानसिंगराव जगदाळे, नामदेवराव पाटील, आनंदराव घोडके, आनंदराव कोरे, रहिमतपूरच्या माजी नगराध्यक्षा ॲड. विद्याराणी साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

७५० कोटींच्या कर्जाचा आकडा कुठून काढला ? : सह्याद्रि कारखान्यावर ७५० कोटींचे कर्ज असल्याचा आकडा विरोधकांनी कुठून काढला?, असा सवाल उपस्थित करत श्री. पाटील म्हणाले, ज्याची परतफेड करण्याची क्षमता आहे, त्यांनाच कर्ज दिले जाते. विस्तारवाढीत एकूण खर्च 448 कोटी होता. 384 कोटीत हे काम बसवले. यामुळे कारखान्याची उत्पादकता वाढणार आहे. खासगी व सहकारी कारखाने कर्ज काढूनच होतात. सभासदांनी निश्चिंत राहावे. ऊस दरावर परिणाम न होता, या कर्जाची परतफेड केली जाईल. कर्जाबाबत समोरासमोर चर्चेची तयारी आहे, असे आव्हानही त्यांनी यावेळी विरोधकांना दिले.

मंत्रीपदाच्या काळात विस्तारवाढ मंजूर केली : सह्याद्रि कार्यक्षेत्रात उसाचे वाढणारे उत्पादन लक्षात घेऊन कारखान्याची विस्तारवाढ करण्याचा निर्णय घेतला. २०१४ ते २०१९ या काळात तत्कालीन सरकारने वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी विस्तारवाढीला परवानगी दिली नाही. २०१९ साली शरद पवार यांनी माझ्यावर सहकार मंत्री पदाची जबाबदारी सोपवली. त्यावेळी विस्तारवाढीच्या फाईलला मंजुरी दिली. विलंब झाल्याने डीपीआर बदलावा लागला. काम सुरू असताना वादळाने नुकसान केले. या अडचणींना तोंड देत विस्तारीकरण पूर्णत्वास आणले.

त्याला बघायला दवाखान्यात गेला होता का? बॉयलरची चाचणी सुरू होती. त्यावेळी ईएसपीमध्ये बिघाड झाला. यामध्ये तीन कामगार जखमी झाले. काहींनी कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले. दवाखान्यात उपचार घेणाऱ्या कामगारांना बघायला व्हिडिओ, फोटोग्राफर, गाड्यांचा ताफा घेऊन गेले. भेटायला जाण्यात अडचण नाही. परंतु, २०२१ साली कराडच्या एका दवाखान्यात चिफ केमिस्ट मरणयातना भोगत होता. त्याला बघायला का गेला नाही? मी त्यावेळी पालकमंत्री होतो. यांची भाषा काय तर, पालकमंत्र्यांनी अडकवले. असे कुणाला अडकवता येते का? केवळ अपप्रचार करणारी ही प्रवृत्ती आहे. विरोधक सभासदांचा बुद्धीभेद करून कारखान्याची बदनामी करत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी भास्करराव गोरे, सज्जनराव यादव, विकास नलवडे, जयवंतराव साळुंखे, वसंतराव कदम, राजेंद्र यादव, शहाजीराव क्षीरसागर, जितेंद्र पवार, प्रकाश जाधव, अशोकराव पाटील, सौ. संगिता साळुंखे, जयवंतराव पाटील, देवराजदादा पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, सुनिलराव माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सर्जेराव खंडाईत, उध्दवराव फाळके यांनी आभार मानले.

शड्डू मारून अपमान कुणाचा करता?

विधानसभा निवडणुकीत निकाल उलटा लागला. माझा पराभव झाला. तो आम्ही स्वीकारला. आम्ही पुन्हा नव्या उमेदीने कामास सुरुवात केली. पराभव झाला तर खचू नये, विजय मिळवला तर उन्माद वाढू देऊ नये. निवडणूक निकालानंतर कारखान्यासमोरच्या पुलावरून मिरवणूक निघाली होती. त्यावेळी कारखाना व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्यासमोर शड्डू मारला. तुमचे वैर माझ्याशी आहे, तर माझ्याशी भांडा. ज्या 32 हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे, ज्यांच्या कष्टातून कारखान्याची उभारणी झाली, ज्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिशा दिली, त्यांचा तुम्ही शड्डू मारून अपमान करता? स्वाभिमानी सभासद तुम्हाला तुमची जागा दाखवतील, अशी टीका बाळासाहेब पाटील विरोधकांवर यांनी केली. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!