आ. मनोज घोरपडे; किवळ येथे सभासद, शेतकऱ्यांची बैठक, अडचणीतून कारखाना बाहेर काढून
कराड/प्रतिनिधी : –
भिकूनाना किवळकर यांचे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीत फार मोठे योगदान आहे. त्यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन ‘सह्याद्रि’च्या उभारणीसाठी शेअर्स गोळा केले. आज ५० वर्षानंतर पुन्हा या संस्थापक सभासदांना सन्मान मिळवून देण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण पॅनलची निर्मिती झाली असून मोठ्या मताधिक्याने हे पॅनेल कारखान्याच्या निवडणुकीत निवडून येईल, असा विश्वास आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला.
सभासद, शेतकरी संवाद बैठक : किवळ (ता. कराड) येथे सह्याद्रि कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने स्व. यशवंतराव चव्हाण पॅनेलच्या प्रचाराच्या अनुषंगाने आयोजित सभासद, शेतकरी संवाद बैठकीत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव जगदाळे, महेश जाधव, अशोकराव पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप साळुंखे, माजी सरपंच सुरेश साळुंखे, दत्तात्रय साळुंखे, अमोल मुळीक, सुरेश पवार, वैभव साळुंखे, सुभाष बाबर, सचिन साळुंखे, राजेंद्र साळुंखे, विलास साळुंखे, संजय पैलवान, सुदाम पैलवान, अमोल कोरडे, ऋषीकेश साळुंखे, तसेच ग्रामस्थ ‘सह्याद्रि’चे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमन असताना काय केले : आज सह्याद्रि कारखाना कर्जाच्या खाईत लोटला आहे, असे सांगताना आ. घोरपडे म्हणाले, 35 वर्ष ज्यांच्या हातात कारखाना आहे. त्यांनी चेअरमन असताना कारखान्याच्या विकासासाठी काय केले ते सांगावे. जुन्या गोष्टी सांगून निवडणुकीत लोकांना भूलथापा देण्यापेक्षा कारखान्याचा विकास मागे का राहिला हे लोकांना सांगावे.
चेअरमनांचीच कारखाना वाचवायची भाषा : आज महाराष्ट्रात अनेक कारखाने चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. मात्र, सह्याद्रि कारखान्यावर कर्जाचा डोंगर आहे. उलट तेच आज गावोगावी जाऊन तेच कारखाना वाचवायची भाषा करतात, मग कारखाना अडचणीत आणला कोणी असा सवाल आ. घोरपडे यांनी व्यक्त केला. तसेच सह्याद्रि साखर कारखाना विजयानंतर ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कारखान्यातील कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. अडचणीतून कारखाना बाहेर काढून संस्थापक, सभासदांना कारखान्यात मान-सन्मान मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
एकतर्फी कारभार : सह्याद्रि साखर कारखान्यात आजपर्यंत एकतर्फी कारभार चालला आहे, असे सांगताना वसंतराव जगदाळे म्हणाले, सहकारात सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. मात्र, विद्यमान चेअरमन यांनी सह्याद्रि’चे एका घरात केंद्रीकरण केले असून या निवडणूकीत स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सहकार तत्व जपण्यासाठी सभासदांनी सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले. प्रदिप साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थापक, सभासदांवर विद्यमान चेअरमनांकडून अन्याय
सह्याद्रि’चे खरे मालक हे त्यावेळी कारखाना उभारणीत रक्ताचं पाणी करणारे जेष्ठ नेते भिकूनाना किवळकर, आबासाहेब पार्लेकर, आर. डी पाटील यांच्यासह अनेक जेष्ठ व समाजासाठी तळमळीने झटणारे लोक होते. त्यांच्यावर कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी कायम दुजाभाव केला. स्वत:च्या मुलाला पुढे करणे, कामगारांना त्रास देणे, ऊसाला योग्यवेळी तोडी न देणे अशा अनेक कारणांनी त्यांना माजी आमदार व्हावे लागले. आता पाच तारखेनंतर ते माजी चेअरमन झालेले असतील, असेही आ. घोरपडे यांनी सांगितले.
