कराड/प्रतिनिधी : –
सध्या ‘सह्याद्रि’च्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीत कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत होत आहे. एकीकडे सत्ताधारी चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्व.पी.डी. पाटील पॅनेल, आ. मनोज घोरपडे व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्रि परिवर्तन पॅनेल, तर कॉंग्रेसचे निवासराव थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्रि शेतकरी परिवर्तन पॅनेल या तीन पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांची ‘सह्याद्रि’साठी आपली तोफ डागणार असून त्यांच्या निशाण्यावर नक्की कोण कोण असणार आहे, याची सभासद, शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.
आज ‘सह्याद्रि’ सभासद संवाद मेळावा : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचाराने शुक्रवार (दि. २८) रोजी हॉटेल सत्यजित विट्स, नोबेल बॅक्वेट हॉल, पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गालगत गोटे (ता. कराड) सायंकाळी ५ वाजता सभासद संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
‘सह्याद्रि’ विघातक शक्तीपासून वाचविला पाहिजे : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आपण सर्वांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखाना विघातक शक्तीपासून वाचविला पाहिजे, यासाठी हा सभासद संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेमकी काय भूमिका घेणार यांची तिन्ही पॅनेल प्रमुखांसह सर्व उमेदवार, तसेच सभासद, शेतकरी आणि नागरिकांचेही लक्ष लागू राहिले आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून ‘सह्याद्रि’ची निर्मिती : सुवर्ण महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने व त्यांचे सहकारी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सह्याद्रि कारखान्याची उभारणी झाली. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक होऊ घातल्याने विचार विनिमय करुन योग्य निर्णय घेण्यासाठी या सभासद संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आवाहन : तरी या सभासद संवाद मेळाव्यास ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मान्यवरांची उपस्थिती : माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील-चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव जगताप (बंडा नाना), सैदापूरचे माजी उपसरपंच सचिन पाटील, केसे येथील भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेचे माजी चेअरमन आनंदराव घोडके, बाबासाहेब पाटील, संदीप शिंदे, दुर्गेशराव मोहिते, कामगार काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पवार, जगदीशचंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
